छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसेतर सरकारकडूनच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झालेला आहे. व्ही. पी. सिंह यांच्या कार्यकाळात बाबासाहेबांना भारतरत्न तर संसदेत तैलचित्र लावण्यात आले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ नोव्हेंबर हा ‘संविधान दिन’ म्हणून घोषित केले, असे सांगत केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली.
राहुल गांधी यांनी नाहक संविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार केला. परंतु त्यांनी कितीही सांगितले तरी संविधान कोणीच बदलू शकत नाही. काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच कार्यकाळात २५ कोटी लोक गरिबीच्या रेषोच्यावर आलेले आहेत, असेही आठवले येथे म्हणाले. कर्जमाफी जरी होणार नसेल तर व्याजमाफी करावी आणि काॅर्पोरेटने तालुके दत्तक घ्यावेत असेही आठवले म्हणाले.
गायरान परिषदेसाठी रविवारी येथे पोहोचताच आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुढे ते म्हणाले, राहुल गांधी यांनी भारत-जोडो यात्रा काढली तेव्हा भारत तोडोचाच नारा दिला. आम्हाला आमच्या देशाचा अभिमान आहे. शेजारच्या देशांसारखी अराजकता आपल्या देशात निर्माण होणार नाही, त्याचे कारण डॉ. बाबासाहेबांचे संविधान. मुंबईत बाबासाहेबांचे स्मारक उभारण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकाळात झाला असला तरी त्यासाठी साडेबारा एकर जमीन व ३ हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या कारकीर्दीतच झाल्याचे आठवले यांनी सांगितले.
भूदान चळवळ राबवावी
देशात २० कोटी एकर गायरान जमीन असून ती भूमिहिनांना द्यावी, यासाठी भूदान चळवळ राबवावी. हे आज अवघड असले तरी अशी चळवळ राबवण्याची गरज व्यक्त करून आठवले यांनी या पार्श्वभूमीवर सरकारने एक समिती गठित करावी व गायरान जमिनींवर सौर-पवन ऊर्जा प्रकल्प उभारू नयेत, अशी मागणीही त्यांनी केली.
मुंबईत उद्या मोर्चा
बिहारमधील महाबोधी-महाविहारच्या न्यासामध्ये सर्वच बौद्ध विश्वस्त करावेत, त्यासाठी १९४९ चा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी मुंबईत १४ ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर, आनंदराज व भीमराज आंबेडकर हे आंबेडकर कुटुंबीय वगळता रिपाइंचे सर्व घटक एकत्र येणार असल्याचा दावा मंत्री आठवले यांनी केला. उद्धव-राज ठाकरे यांच्या भेटीवर बोलताना आठवले म्हणाले, त्यांच्या जशा भेटी-गाठी होतात, तशा माझ्या व ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या व्हाव्यात. आम्ही दोघे एकत्र आल्याशिवाय रिपाइं ऐक्य नाही.
न्या. गवईंवरील हल्ला निषेधार्ह
सरन्यायाधीश न्या. गवईंवरील बूट फेकीचा प्रयत्न हा निषेधार्ह असून ज्याने हे कृत्य केले त्याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा. ज्यांना संविधान मान्य नाही त्यांना देशाबाहेर काढावे, असेही आठवले म्हणाले.
