छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) विद्यार्थी संख्येत यावर्षीपासून २१ हजारांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक तथा मेजर जनरल विवेक त्यागी यांनी येथे दिली. आजच्या परिस्थितीत राज्यात एक हजार ८०० शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्यांमधील एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थी हे एनसीसीचे आहेत.

एनसीसीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमही असणार असून, विद्यार्थी अधिक तंत्रस्नेही घडावेत, यासाठी त्यांना शिबिर कार्यकाळात ड्रोनचे प्रशिक्षण प्रमाणपत्रासह देण्यात येणार आहे, असेही त्यागी यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथील पडेगाव भागातील सैन्य दलाच्या कार्यालयापासून काही अंतरावर १२७ कोटी रुपये खर्चातून राज्यातील पहिली ‘छावा एनसीसी अकादमी’ उभी राहत आहे. या अकादमीच्या सात मजली इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (२५ ऑक्टोबर) करण्यात आले. या कार्यक्रमानंतर त्यागी यांनी माध्यम प्रतिनिधींशी वार्तालाप केला. या वेळी ब्रिगेडिअर अनुप बरबरे उपस्थित होते.

त्यागी म्हणाले, येथील अकादमी पुढील दोन वर्षांत उभी राहील, असा विश्वास आहे. १२७ कोटी रुपयांपैकी भूमिपूजनापूर्वी दोन कोटी रुपये प्राप्त झाले असून, ५० कोटींचा हप्ताही लवकरच प्राप्त होईल.

अकादमीच्या प्रशिक्षण केंद्रात वर्षभर १४० शिबिरे चालतील. येथे गोळीबार केंद्र, सभागृह, ५०० विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहाची व्यवस्था असून, महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांतील एनसीसीच्या विद्यार्थ्यांसाठी छावा अकादमी महत्त्वाचे केंद्र राहणार आहे. दिल्लीतील परेडसाठी निवडल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुकडीचे शिबिरही येथेच घेतले जाईल. दरवर्षी २४ हजार विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण येथे होईल.

मुंबई, रत्नागिरीतही अकादमी

राज्यात सात एनसीसी समूह मुख्यालयांमध्ये एक-एका अकादमीची आवश्यकता आहे. मात्र, रत्नागिरी आणि मुंबई येथे मिळून आणखी दोन अकादमींची उभारणी होण्याची शक्यता आहे. या संदर्भाने भूमिअधिग्रहणही करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहितीही त्यागी यांनी दिली.

अडीचशे विद्यार्थ्यांमागे क्रीडा शिक्षक

राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाकडून शाळा-महाविद्यालयांमध्ये अडीचशे विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक नियुक्त करावा, असा प्रस्ताव देण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री माणिकराव कोकाटे यांनी येथे दिली.

एनसीसीच्या नियमाप्रमाणे विशिष्ट आकार-क्षेत्रफळाची मैदाने शाळा-महाविद्यालयांकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे एनसीसीचे वर्ग सुरू करण्यात येत नाहीत; याकडे लक्ष वेधल्यानंतर मंत्री कोकाटे यांनी एनसीसी विभागासाठी मैदानांची अडचण असेल तर ती दूर करू आणि त्यांना आवश्यक त्या सेवाही क्रीडा व युवक कल्याण विभागाकडून पुरवण्यात येतील, असे सांगितले.