धाराशिव: ठाकरे सरकारने राज्याच्या हिश्शयाचा वाटा न दिल्यामुळे रखडलेल्या धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामाला आता मोठी गती आली आहे. धाराशिव-तुळजापूर या पहिल्या टप्प्यातील ३० किलोमीटर कामापैकी साधारणपणे आठ किलोमीटर अंतराचे काम मोठ्या वेगात सुरू आहे. जवळपास २५ टक्के काम पूर्णत्वाकडे आले असून या मार्गावर एकूण लहान-मोठे एकूण ५० पूल असणार आहेत. त्यापैकी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर १०६ मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल साकारला जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यातील २५ टक्के काम पूर्णत्वाच्या दिशेने आले आहे. सध्या तीन टप्प्यात काम सुरू आहे. त्यानुसार खोदकाम, भराव आणि पुलांच्या कामांना हाती घेण्यात आले आहे. धाराशिव ते तुळजापूर या ३० किलोमीटर अंतरावर एकूण १७ मोठे पूल असणार आहेत. तर ३३ छोटे पूल साकारले जाणार आहेत. एकूण ५० छोटे-मोठे पूल ३० किलोमीटर अंतरावर आहेत. त्यात रेल्वे स्थानकाजवळ सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर १०६ मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या नकाशांचे काम अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यातील ३० किलोमीटरच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी ५४४ कोटी रूपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. या मार्गावरील अन्य पुलांच्या कामांना डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच हाती घेतले जाणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. ठाकरे सरकारने राज्याच्या वाट्याचा हिस्सा नाकारल्यामुळे रखडलेल्या कामांना महायुती सरकारकडून निधीची उपलब्धता करून देण्यात आल्यानंतर मोठी गती आली आहे. उपळा ते सांजा आणि पुढे पळसवाडीपर्यंत साधारणपणे आठ किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचे खोदकाम आणि भरावाचे काम पूर्णत्वाच्या टप्प्यात आले आहे. त्यामुळे ठरविलेल्या उद्दिष्टाप्रमाणे दोन वर्षांच्या आत रेल्वेमार्ग तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्रापर्यंत पोहोचेल असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोध्दारास प्रारंभ; पुजारी, भाविकांच्या कामाबाबत सूचनांना प्राधान्य – राणाजगजितसिंह पाटील

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या एकूण ८४ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यात धाराशिव जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे केले आहेत. या रेल्वेमार्गावर एकूण ११० पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ३२ गावांतील एक हजार ३७५ एकर जमीन त्यासाठी भूसंपादीत करण्यात आली आहे. संपादीत जमिनीच्या वाढीव मावेजासाठी दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांची लवाद अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

धाराशिव-तुळजापूर या ३० किलोमीटर रेल्वेमार्गावर तीन नवीन रेल्वेस्थानके उभारली जाणार आहेत. धाराशिव ते सांजा या १० किलोमीटर अंतरावर सांजा येथे पहिले रेल्वे स्थानक असणार आहे. सांजा ते वडगाव या १२ किलोमीटर अंतराच्या टप्प्यावर दुसरे रेल्वेस्थानक तर वडगाव ते तुळजापूर या आठ किलोमीटर अंतरावर तिसरे स्थानक उभारले जाणार आहे. या रेल्वेमार्गावर एकूण चार स्थानके असणार आहेत. त्यात धाराशिव येथील सध्या अस्तित्वात असलेल्या मुख्य रेल्वेस्थानकाचाही समावेश आहे. मुख्य रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी नुकतेच नरेंद्र मोदी यांच्या सरकारने २१ कोटी रुपयांचा निधी सुपूर्द केला असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : पोटच्या दोन लेकरांना पाण्यात बुडवून आईची आत्महत्या, तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथील घटना

युध्द पातळीवर काम सुरु

सध्या खोदकाम आणि भरावाचे काम वेगात सुरू आहे. नियोजित उद्दिष्टानुसार युध्द पातळीवर काम सुरू असल्याने पुढील आठवड्यापासून या मार्गावरील पुलांच्या कामांना सुरूवात होणार आहे. भरावानंतर ब्लँकेटींग त्यानंतर बलास म्हणजेच खडी अंथरण्याचे कामही हाती घेतले जाणार आहे. ते पूर्ण होताच स्लीपरच्या कामाला सुरूवात होईल. स्लीपरचे काम जसजसे पुढे जाईल, तसतसे रेल्वेची मुख्य पटरी अंथरण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharashiv tuljapur railway line work 25 percent completed 106 meter long flyover on dhule solapur national highway css