छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील मिळून ३५ मंडलात अतिवृष्टी झाली आहे. गुरुवारी सकाळी घेतलेल्या नोंदीतून ही माहिती पुढे आली आहे. अतिवृष्टी झालेल्या ३५ मंडलांमध्ये जालना, परभणी व बीडमधील प्रत्येकी ११, लातूर व हिंगोलीतील प्रत्येकी एका मंडलाचा समावेश आहे.

परभणीतील पेडगाव, जांब, पाथरी, केसापुरी, जिंतूर, वाघी धानोरा, सेलू, देऊळगाव, चिकलठाणा, मोरेगाव व मानवत, तर बीडमधील बीड, राजुरी, चऱ्हाठा, गेवराई, सिरसदेवी, तलवाडा, अंबाजोगाई, सिरसाळा, धारूर, मोहखेड, अंजनढोह या मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. लातूरमधील रेणापूर व हिंगोलीतील हट्टा येथेही अतिवृष्टी झाली आहे.

हवामान विभागाने मराठवाड्यात पावसाच्या शक्यतेचा अंदाज वर्तवल्यानंतर बुधवारी सकाळपासून अनेक भागांत हलका, मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगरमध्येही बुधवारी दुपारी पाऊस झाला. परंतु एक सडाका येऊन पाऊस थांबला. मंगळवारी मात्र, सायंकाळी ४ नंतर सुरू झालेला पाऊस सुमारे पाऊण तास धो-धो बरसला. शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. परंतु पाऊस काही बरसला नाही. पाऊस थांबला की तापमान वाढत आहे.

जालन्यातील तीन तालुक्यांतील मंडलात अतिवृष्टी

जालना : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि मंठा तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. आतापर्यंत घनसावंगी तालुक्यात १८० मि. मी. पावसाची नोंद झाली असून त्यापैकी निम्मा म्हणजे ८९ मि.मी. पाऊस गुरुवारी (१७ जुलै) रोजी झाला. घनसावंगी, परतूर व अंबड तालुक्यातील मिळून नऊ मंडलात अतिवृष्टीची गुरुवारी नोंद झाली आहे. परतूर तालुक्यात आतापर्यंत १४४ मि. मी. पावसाची नोंद झाली असून त्यापैकी ६० मि.मी. पाऊस गुरुवारी एका दिवसात झालेला आहे.

अंबडमध्येही सरासरी ३४ मि. मी. पाऊस झाला. त्यामुळे या तालुक्यात आतापर्यंत सरासरी एकूण पाऊस १४८ मि.मी. झाला आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २७ मि. मी. पावसाची नोंद झाली. या काळात घनसावंगी तालुक्यातील सहा महसूल मंडलात अतिवृष्टी झाली. घनसावंगी (८७), राणी उंचेगाव (७१), तीर्थपुरी (११७), कुंभार पिंपळगाव (९५), रांजणी (८६), आणि जांबसमर्थ (९५). तर, आष्टी (९३ मि.मी.) आणि सातोना (६८०३ ६८) या दोन महसूल मंडलांत गुरुवारी अतिवृष्टी झाली. तर अंबड तालुक्यातील सुखापुरी (८५) या महसूल मंडलात अतिवृष्टी झाली.