छत्रपती संभाजीनगर : कत्तलखान्यामध्ये जनावरे नेताना व मांस विक्री तसेच निर्यातीदरम्यान बजरंग दलाकडून होणाऱ्या तपासण्यांमुळे वैतागलेल्या कुरेशी समाजाने गेल्या दीड महिन्यापासून सुरू केलेल्या आंदोलनाचा फटका आता म्हशींच्या कत्तलखान्यास बसू लागला आहे. मुंबईतील देवनार वगळता अन्य कत्तलखाने अत्यंत कमी क्षमतेने कसेबसे सुरू आहेत. त्याची झळ प्राणिसंग्रहालयातील जनावरांपर्यंत पोहोचू लागली आहे. विदर्भातील सर्वांत मोठ्या प्राणिसंग्रहालयातील वाघांना आता बकऱ्या आणि कोंबड्यांचे मांस दिले जात आहे. संभाजीनगरच्या प्राणिसंग्रहालयात वाघ व इतर प्राण्यांसाठी मांस पुरवताना कसरत करावी लागत असल्याचे कंत्राटदार सांगत आहेत. दरम्यान या प्रकरणात विशेष पोलीस महानिरीक्षकांनी लक्ष घालावे, अशी मागणी ‘ऑल इंडिया जमेतुल कुरेशी संघटने’च्या वतीने करण्यात आली आहे.

संभाजीनगर शहरात ‘आलाना’ आणि ‘अल कुरेशी’ असे दोन ‘आपेडा’ प्राधिकृत कत्तलखाने आहेत. या कत्तलखान्यात दाखल होणाऱ्या म्हशींची माहिती पशुसंवर्धन विभागास दर आठ दिवसाला पुरवली जाते. या अहवालातील आकडेवारीची माहिती देताना पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम म्हणाले, ‘कुरेशी आंदोलनाचा फटका कत्तलखान्याला बसला असल्याचे जाणवत आहे. गेल्या आठवड्यात अलकुरेशी नावाचा कत्तलखाना बंद झाला होता. तर ॲलना ही परदेशात मांसविक्री करणारी कंपनी कमी क्षमतेने कशीबशी सुरू आहे. गेल्यावर्षी या कंपनीतून चार लाख ८२ हजार म्हशींची कत्तल झाली होती. राज्य सरकारकडे प्रती म्हैस २०० रुपयांप्रमाणे नऊ कोटी ६५ लाख रुपयांचा महसूल भरला होता. या वर्षी प्रति दिन २५० पर्यंत होणारी कत्तल आता अगदीच नगण्य आहे.’

नागपूरमध्ये सर्वात मोठे प्राणिसंग्रहालय वन मंडळाच्या वतीने सुरू असून येथील वाघांना आता बकऱ्यांचे आणि कोंबड्यांचे मांस पुरवले जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मोठ्या जनावरांच्या मांस निर्यातीसाठी ‘आपेडा’ प्राधिकृत कत्तलखान्याच्या कामकाजावर परिणाम होत आहे. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असणाऱ्या या संपाबाबत माहिती देताना सिराज कुरेशी म्हणाले, ‘जनावरांच्या खरेदी-विक्रीवर आता परिणाम होऊ लागले आहेत. कत्तलखान्यांमध्ये काम करणाऱ्या छोट्या व्यक्तीच्या अर्थकारणावरही त्याचे परिणाम होऊ लागले आहेत.’ तीन लाख टन मांसनिर्यात आता जवळपास थांबली असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी नियम पाळावेत, असे वातावरण निर्माण करण्यास मदत करावी, अशा आशयाचे निवेदन पोलीस महानिरीक्षकांनाही दिले आहे.