छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सत्ताधारी पक्षांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने (उद्धव ठाकरे) गुरुवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात आंदोलन केले. दोन तासांच्या या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळत झाली. ट्रॅक्टर आंदोलनानंतर दुसऱ्या दिवशीच्या या आंदोलनास प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला जात आहे.जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोरील वळण रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्याच्या प्रश्नांसह इतर विषयांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाच जून रोजी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या ‘क्या हुआ तेरा वादा?’ या आंदोलनाचा समारोप गुरुवारी ‘चक्का जाम’ आंदोलनाने करण्यात आला. ‘विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी कर्जमुक्तीचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. परंतु, आता त्यांना याचा विसर पडला असल्याचा आरोप भास्कर अंबेकर यांनी केला.

विदेशातून कापूस आयात करण्याच्या सरकारच्या धोरणामुळे कापसाच्या भावात घसरण होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतीमालाच्या हमीभावात दीडपट वाढ करण्याचे आश्वासन तर निव्वळ भूलथापच ठरली आहे. आर्थिक अडचणीत आल्यामुळे मागील सात महिन्यांत राज्यात एक हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. राज्यातील पंचेचाळीस हजार गावांत पाणंद रस्ते देण्याच्या आश्वासनाचाही सरकारला विसर पडला आहे . मराठवाडा वॉटर ग्रीड, नोकर भरती, पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती इत्यादी आश्वासनांकडे लक्ष देण्यास सत्ताधारी मंडळींना वेळ नाही, असे ते म्हणाले.

नांदेडमध्येही सेनेच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला. वळवाच्या पावसामुळे झालेल्या बागायतदारांना सत्वर मदत करावी या व अन्य मागण्याही शिवसैनिकांनी मांडल्या. गुरुवारी शिवसैनिकांनी नांदेड नागपूर महामार्गावर असलेल्या पिंपळगाव येथे चक्का जाम आंदोलन केले. सकाळी ११ वाजता वेगवेगळ्या ग्रामीण भागांतून आलेले शिवसैनिक येथे जमले.

हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी, शेतमालाला लागवड खर्चाच्या तुलनेत हमीभाव द्यावा, एक रुपयामध्ये पीकविमा द्यावा, डीएपी खत उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या. हिंगोली तालुक्यातील बासंबा फाटा येथे महामार्गावरील मंजुरी मिळालेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम तातडीने सुरू करावे, अशा मागण्या शिवसैनिकांनी केल्या. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी केले. यावेळी माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार डाॅ. संतोष टारफे आदींसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

दुतर्फा वाहतूक कोंडी

शिवसेने (उबाठा)च्या वतीने सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे वाशिम आणि हिंगोली या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली.