छत्रपती संभाजीनगर : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळातील रमीचा डाव समाजमाध्यमातून पुढे आल्यानंतर लातूर येथे छावा येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देत त्यांना पत्त्याचा डावही दिला. ‘ आम्ही मंत्र्यांना आमचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवतो. ते जर पत्ते खेळत असतील तर त्यांना घरी बसवून पत्ते खेळायला हे पत्ते द्या, असे म्हणत कार्यकर्ते संतापले.

निवेदन दिल्यानंतर घोषणाबाजी करत परतणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या अंगावर राष्ट्रवादी कार्यकर्ते गेले. त्यांनी मारहाण केली. त्यामुळे सुनील तटकरे यांच्या पत्रकार बैठकीनंतर मोठा गोंधळ झाला.

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची तयारी करण्यासठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सध्या मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात भेटी देत आहेत. लातूर येथे पत्रकार बैठकीनंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांना निवेदन दिले. मात्र, निवेदन देऊन झाल्यानंतर त्यांनी पत्तेही उधळले. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही चिडले. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये मोठी हाणामारी झाली. ‘मी काही तुमच्याबरोबर भांडायला आलो नाही. पण राज्याच्या कृषी मंत्र्यांना हे पत्ते द्या आणि त्यांना घरी बसून ते खेळायला सांगा. त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही असे आमचे मत आहे.

राज्याच्या सर्वोच्च सभागृहात कायदे करण्याऐवजी जर पत्ते मंत्री पत्ते खेळत असतील तर त्याची प्रतिक्रिया म्हणून लोकशाही मार्गाने निवेदन देण्यासाठी गेलाे होतो, ’ असे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे म्हणाले. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. लाथा, बुक्क्यांनी आणि खुर्च्या उचलून ही हाणामारी करण्यात आली. निवेदन देताना असंसदीय भाषा वापरण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.