मुंबई : एयू स्मॉल फायनान्स बँकेने ‘एम सर्कल’ नावाच्या महिलांसाठी बँकिंग सेवांच्या खास योजनेची नुकतीच घोषणा केली. महिलांच्या विशिष्ट गरजांवर लक्ष देऊन, त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्याची रचना केली गेली आहे.
भारतातील महिलांकडून संपत्ती निर्मिती, संपत्तीचा वारसा तसेच महिला त्यांच्या जीवनशैली आणि स्वत्वाबद्दल अधिक जागरूक होत असताना, बँकांनी पारंपारिक ठेवी आणि कर्जांच्या पलीकडे या ग्राहक वर्गावर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक बनले आहे. त्यांची आर्थिक उद्दिष्टे आणि विकसित गरजा पूर्ण करणे अत्यावश्यक आहे, असे बँकेने या संबंधाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
एकल महिला-केंद्रित खाते देणाऱ्या पारंपारिक बँकिंग कार्यक्रमांपेक्षा, ‘एम सर्कल’चे वेगळेपण म्हणजे एयू बँक अनेक प्रीमियम स्वरूपाच्या सेवांपलीकडे विविधांगी फायदे महिला ग्राहकांना प्रदान करते. जसे ‘एम सर्कल’ ग्राहकांना लॉकर भाड्यावर २५ टक्के अतिरिक्त सूट मिळेल; ०.२ टक्के कमी व्याजदरासह प्राधान्याने कर्ज आणि नायका, अजिओ लक्स, कल्याण ज्वेलर्स, बुकमायशो, झेप्टो आणि स्विगीवरील विशेष ग्राहक सवलतींचाही त्यांना लाभ मिळेल, असे बँकेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
याशिवाय, त्यांना मोफत प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीचा (कर्करोग तपासणीसह) लाभ मिळेल; स्त्रीरोग, बालरोग तज्ञ यासारख्या विशेष विषयांमध्ये अमर्यादित ऑनलाइन सल्लामसलत आणि ऑफलाइन भेटीगाठी महिला खातेदारांना करता येतील.
मुंबईत मुख्यालय असलेली एयू स्मॉल फायनान्स बँक ही १९९६ मध्ये वाहन वित्त कंपनी म्हणून सुरू झाली होती, जी नंतर २०१७ मध्ये स्मॉल फायनान्स बँकेत रूपांतरित झाली. या बँकेचे शेअर्स हे राष्ट्रीय (NSE) आणि मुंबई (BSE) शेअर बाजारावर सूचीबद्ध आहेत. बँकेचा शेअर शुक्रवारी एनएसईवर ३.१४ टक्क्यांच्या वाढीसह ९०८.७० रुपयांवर बंद झाला. गत महिनाभरात त्याचा भाव १९ टक्के, तर चालू वर्षांत आजपर्यंत ६२.५३ टक्क्यांनी वधारला आहे.
