मुंबई : ब्लू-चिप कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेली नफावसुली आणि परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा मारा केल्याने गुरुवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सची ५४२ अंशांनी पीछेहाट झाली.
सकारात्मक सुरुवात होऊनही, गुरुवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स तेजी टिकवून राखण्यास अपयशी ठरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५४२.४७ अंशांनी घसरून ८२,१८४.१७ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ६७९.४२ अंश गमावत ८२,०४७.२२ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १५७.८० अंशांची घसरण झाली आणि तो २५,०६२.१० पातळीवर बंद झाला.
भारत आणि ब्रिटनने गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (एफटीए) झाला, जो ब्रिटिश व्हिस्की, वाहने आणि विविध वस्तूंवरील शुल्क कमी करेल, तसेच द्विपक्षीय व्यापार दरवर्षी सुमारे ३४ अब्ज डॉलर्सने वाढवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ब्रिटिश समकक्ष केयर स्टारमर यांच्या उपस्थितीत वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि त्यांचे ब्रिटिश समकक्ष जोनाथन रेनॉल्ड यांनी या करारावर स्वाक्षरी केली. एफटीएमुळे भारतीय निर्यातीला ९९ टक्के आयात शुल्काचा फायदा होण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळे ब्रिटिश कंपन्यांना भारतात व्हिस्की, वाहने आणि इतर उत्पादने निर्यात करणे सोपे होईल, तसेच एकूण व्यापारी बाजाराला चालना मिळेल, असे भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई शेअर बाजारच्या आकडेवारीनुसार, बुधवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ४,२०९.११ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली. तर दुसरीकडे देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजाराला साथ देत (डीआयआय) ४,३५८.५२ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.
तज्ज्ञांचे म्हणणे काय?
सकारात्मक जागतिक संकेत असूनही भारतीय शेअर बाजार आज मोठ्या प्रमाणात घसरले. भारत-ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार कराराबद्दलच्या सुरुवातीच्या आशावादामुळे सावधगिरी बाळगली गेली. बहुतांश क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांची पहिल्या तिमाहीतील कामगिरी निराशाजनक राहिली. मुख्यतः माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रांतील लार्ज-कॅप कंपन्यांमध्ये घसरण केली. पहिल्या तिमाहीतील उत्पन्न आणि मूल्यांकनामध्ये अजूनही मोठी तफावत आहे. – विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड.
कोणते समभाग घसरले-वधारले
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये ट्रेंट, टेक महिंद्र, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, कोटक महिंद्र बँक, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि एनटीपीसी यांची कामगिरी निराशाजनक राहिली. तर टाटा मोटर्स, सन फार्मा, टाटा स्टील आणि टायटनचे समभाग तेजीसह स्थिरावले.
- सेन्सेक्स – ८२,१८४.१७ -५४२.४७
- निफ्टी – २५,०६२.१० -१५७.८०
- तेल – ६९.३६ +१.२४ टक्के
- डॉलर – ८६.४० -१ पैसा