पीटीआय, नवी दिल्ली
लाखो भारतीयांना वेळेचे भान करून देणारी आणि एकेकाळी सर्वसामान्यांच्या हातातील ‘ताईत’ बनलेले एचएमटी घड्याळाने निर्माण केलेला वसा पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. केंद्रीय मंत्री एच.डी कुमारस्वामी यांनी शुक्रवारी या सार्वजनिक क्षेत्रातील घड्याळ उत्पादक कंपनीची कामगिरी आणि भविष्यातील आराखड्यावर चर्चा करण्यासाठी एक आढावा बैठक घेतली, ज्यामध्ये भारतीय स्वदेशी घड्याळ कंपनीचा वारसा मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली.
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेली एचएमटी लिमिटेड, ही अवजड उद्योग मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली येते. कंपनीचे दोन उत्पादन प्रकल्प आहेत. औरंगाबाद येथे अन्न-प्रक्रिया यंत्रसामग्री प्रकल्प आणि बेंगळुरू येथे सहाय्यक व्यवसाय विभाग आहे. अन्न प्रक्रिया यंत्रसामग्री प्रकल्पात दूध प्रक्रिया आणि इतर अन्न प्रक्रिया अनुप्रयोगांसाठी विविध प्रकारच्या यंत्रसामग्री तयार केल्या जातात. ते दूध प्रक्रिया उद्योग उभारून देणारे टर्न-की प्रकल्प देखील हाती घेते.
एचएमटीचा वारसा जिवंत ठेवण्यासाठी या प्रकल्पाने घड्याळे आणि घड्याळे असेंब्ली आणि विक्री हाती घेतली आहे. बाजारातील खासगी कंपन्यांना एचएमटीने चांगली टक्कर दिली. मात्र, २००० नंतर कंपनीची उत्पादने हळूहळू मागे पडत गेली आणि कंपनीच्या पुनर्रचनेच्या प्रयत्नांनंतरही तोटा वाढत गेला. अखरे २०१४ ते २०१६ दरम्यान टप्प्याटप्प्याने घड्याळ उत्पादन विभागाने गाशा गुंडाळला. मात्र जुन्या वस्तूंच्या संग्राहकांसाठी ही घड्याळे अजूनही बाजारात उपलब्ध आहेत.
जपानमधील सिटीझन वॉच या कंपनीच्या साथीने १९६१ मध्ये एचएमटी कंपनीची सुरुवात झाली. सत्तर ते नव्वदच्या दशकांमध्ये या कंपनीने भारतीयांचा विश्वास संपादन केला होता. घड्याळांच्या बाजारातील मोठा हिस्सा याच कंपनीकडे होता. मात्र उदारीकरणानंतर खुल्या झालेल्या बाजारपेठेतील स्पर्धेत निभाव न लागल्याने, २००० पासून या कंपनीच्या तोट्यात वाढच होत गेली, कर्मचाऱ्यांचे पगार देणेही मुश्किल झाले. मार्च २०१२ मध्ये कंपनीने कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर आवश्यक खर्चांसाठी सरकारकडून ६९४.५२ कोटी रुपयांचे कर्जही घेतले होते. ३१ मार्च २०१३ अखेर कंपनीमध्ये ११०५ कर्मचारी कार्यरत होते.