मुंबईः वीज वितरण आणि पारेषण या देशांतील सर्वात वेगाने वाढ साधत असलेल्या उद्योग क्षेत्रातील सर्वच बड्या आणि खासगी – सरकारी मौल्यवान कंपन्यांसाठी पुरवठादार म्हणून भूमिका बजावणाऱ्या पार्थ इलेक्ट्रिकल्स आणि इंजिनीयरिंग लिमिटेडची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) प्रत्येकी १६० रुपये ते १७० रुपये किंमत पट्ट्याने येत्या ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट २०२५ दरम्यान सुरू राहिल, असे कंपनीने बुधवारी पत्रकार परिषदेत घोषित केले.

प्रथितयश सूक्ष्म, लघू व मध्यम (एमएमई) उद्योगातील कंपन्यांसाठी स्थापित ‘एनएसई इमर्ज’ बाजारमंचावर सूचिबद्धतेसाठी असलेल्या या आयपीओतून कंपनी ४९.६६ कोटी रुपयांचे भांडवल उभारू पाहत आहे. जिग्नेश पटेल प्रवर्तित बडोदेस्थित पार्थ इलेक्ट्रिकल्स या भांडवलाचा वापर बडोद्यात तसेच ओडिशा येथे नवीन उत्पादन प्रकल्प स्थापित करण्यासाठी तसेच अल्प मुदतीच्या कर्जाची आंशिक परतफेड करण्याच्या उद्देशाने करणार आहे. होरायझन मॅनेजमेंट प्रा. लि. ही कंपनी या भागविक्रीचे व्यवस्थापन पाहात आहे.

पार्थ इलेक्ट्रिकल्सने फ्रान्सच्या श्नायडर इलेक्ट्रिक आणि चीनच्या हेझॉन्ग या कंपन्याशी तंत्रज्ञानात्मक सहकार्याचा करार केला असून, त्यायोगे भारतात सर्वाधिक मागणी असलेल्या ११ केव्ही ते ४०.५ केव्ही क्षमतेचे जीआयएस आणि ३३ केव्ही आरएमयूचे उत्पादन ती घेत आहे. कंपनी येत्या काळात तिच्या ताफ्यात आणखी काही विद्युत उत्पादनांची भर घालणार असून, निर्यातीच्या दृष्टीने तिने अमेरिका आणि कॅनडाच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या तीन वर्षात कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक सरासरी १०० टक्के दराने वाढत आला असून, मार्च २०२५ अखेर तो १०.१२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.