मुंबई : परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेला समभाग विक्रीचा मारा आणि अमेरिकेतील एच-१बी व्हिसा शुल्कात झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण कायम असून, परिणामी बुधवारी सलग चौथ्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक घसरले.
बुधवारी सत्रअखेर सेन्सेक्स ३८६.४७ अंशांनी घसरून ८१,७१५.६३ पातळीवर बंद झाला. सत्रात त्याने ४९४.२६ अंश गमावत ८१,६०७.८४ या नीचांकी पातळीला स्पर्श केला. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये ११२.६० अंशाची घसरण झाली आणि तो २५,०५६.९० पातळी वर बंद झाला. मात्र या सलग पडझडीतही निफ्टी निर्देशांक २५ हजारांच्या पातळीपुढे टिकून राहण्यास यशस्वी ठरला आहे.
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) रचनेतील सुधारणांनंतर देशांतर्गत भांडवली बाजारात नफावसुली सुरू झाली आहे. गुंतवणूकदारांनी दुसऱ्या तिमाहीतील उत्पन्नाच्या अपेक्षांचे पुनर्मूल्यांकन केले आहे. एच-१बी व्हिसा शुल्कवाढीमुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांत घसरगुंडी सुरू आहे. अमेरिकेशी तोडग्याविना सुरू असलेल्या व्यापारी वाटाघाटी आणि कमकुवत जागतिक संकेतांमुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. समभागांचे उच्च मूल्यांकन, कंपन्यांच्या तिमाही कामगिरी मंदावण्याची शक्यता आणि परदेशी गुंतवणूकदारांनी फिरवलेली पाठ बाजार घसरणीस कारणीभूत आहे, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्र, महिंद्र अँड महिंद्र, आयसीआयसीआय बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि ॲक्सिस बँक यांचे समभाग घसरले. तर पॉवर ग्रिड, हिंदुस्तान युनिलिव्हर, एनटीपीसी आणि एचसीएल टेकची कामगिरी सकारात्मक राहिली. मंगळवारच्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ३,५५१.१९ कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले.
सेन्सेक्स ८१,७१५.६३ ३८६.४७ (०.४७%)
निफ्टी २५,०५६.९० ११२.६० (०.४५%)
तेल ६७.९३ ०.४४%
डॉलर ८८.७१ -२ पैसे
