पुणे : ब्रिटनमधील फॅशन नाममुद्रा नेक्स्टने मिंत्रा जबॉन्ग इंडिया आणि त्यांच्या फ्रँचाईझी भागीदारांच्या सहयोगाने भारतातील पहिले दालन पुण्यात शुक्रवारी सुरू केले. देशातील महानगरांमध्ये २०३० पर्यंत ५० दालने सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
याबाबत मिंत्राचे व्यूहात्मक भागीदारी प्रमुख वेणू नायर म्हणाले की, नेक्स्टची ब्रिटनमध्ये मध्ये ४६० दालने, २६५ आंतरराष्ट्रीय दालने असून जगभरातील ८० देशांमध्ये ऑनलाइन उपस्थिती आहे. ब्रिटनमधील सर्वात मोठी फॅशन कंपनी म्हणून नेक्स्टची ओळख आहे. आता मिंत्रा जबॉन्ग इंडियाच्या माध्यमातून फ्रँचाईझी पद्धतीने भारतात दालने सुरू केली जाणार आहेत. त्यातील पहिले दालन शुक्रवारी पुण्यात पॅव्हेलियन मॉल सुरू झाले. हे दाल ७,१०० चौरस फुटांचे आहे. ग्राहकांना उत्पादनांच्या विविध श्रेणी सहजतेने पाहता येतील, अशी पद्धतीने या दालनांची रचना केलेली आहे.
येत्या पाच ते सहा वर्षांत मिंत्रा जबॉन्ग इंडियाच्याच्या फ्रँचाईझी भागीदारांच्या माध्यमातून देशभरात ५० पेक्षा जास्त दालने सुरू करण्याचे नेक्स्टचे लक्ष्य आहे. त्यापैकी हैदराबाद, दिल्ली, मुंबई आणि बंगळूर येथे लवकरच नेक्स्टचे आगमन होईल. या स्वतंत्र दालनांव्यतिरिक्त शॉपर्स स्टॉपच्या दालनांमधूनही नेक्स्टची उत्पादने उपलब्ध होणार आहेत. भारतीयांचा कल आता आंतरराष्ट्रीय नाममुद्रांच्या कपड्यांकडे वाढू लागला आहे. यामुळे आगामी काळात इतर आंतरराष्ट्रीय नाममुद्रांसोबत अशा प्रकारची भागीदारी केली जाईल, असे नायर यांनी नमूद केले.
