शनिवार, २३ ऑगस्टच्या पुरवणीतील माधवी घारपुरे यांचा ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हा लेख थोडक्यात खूप काही सांगून जातो. आपल्याला लहानपणापासून सांगितले जाते की, पानात काही टाकू नये, पान स्वच्छ करावे, पानात जरुरीपुरतेच अन्न घ्यावे. हे संस्कार आपण आपल्या लहान मुलांनाही देतो. पण प्रत्येक वेळी हे पाळले जातेच असे नाही. लेखात म्हटल्याप्रमाणे, अन्न वाया जाऊ नये, हवे तेवढेच घेता यावे म्हणून ‘बुफे’ची पद्धत सुरू झाली. पण त्याचा उलटाच परिणाम झाला. ‘बुफे’तील अनंत पदार्थ पाहून ‘फेफे’ उडते. गमतीचा भाग वेगळा, पण बुफेतील सगळेच पदार्थ चमचमीत, तोंडाला पाणी सुटणारे असतात म्हणून आपण ते सगळेच वाढून घेतो. तसेच परत परत उठावे लागू नये म्हणून आपण अनेक पदार्थ एकदम घेतो आणि मग न संपलेले पदार्थ टाकावे लागतात. मला वाटते जेवायला सुरुवात करण्यापूर्वी जेवण ठेवलेल्या ठिकाणी आपण एक फेरी मारून कोणकोणते पदार्थ आहेत ते पाहून घेतले आणि नंतर आपल्याला खाता येईल तेवढेच आवडीचे पदार्थ ताटात घेतले तर अन्न वाया जाणार नाही.
लेखामध्ये उल्लेख केलेला गुजरातमधील ‘गांधीनगर आयआयटी’ महाविद्यालयात अन्न वाया न जाऊ देण्यासाठी विद्यार्थ्यांना जागरूक करणारा प्रकल्प स्तुत्य आणि अनोखा आहे. उद्याोगपती रतन टाटा किंवा माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख यांना याविषयी किती जाणीव होती तेही या लेखातून कळते. अन्न जर उरत असेल तर ते वेळीच शिळे होण्याआधी गरजू लोकांना देऊन टाकावे. लेखात म्हटल्याप्रमाणे, शेतकरी कष्टाने जे धान्य पिकवतात ते वाया जाऊ देऊ नये. त्यांच्या श्रमाची किंमत आपल्याला समजली पाहिजे हे खरेच! जेवून उठतानाही ‘अन्नदाता सुखी भव!’ असे म्हणावे हे आपल्याला आपल्या आजी-आजोबांनी, आई-वडिलांनी शिकवले आहे तीच शिकवण आपण आपल्या मुलांनाही दिली पाहिजे. – मृदुला गोखले, मुलुंड
प्रत्येक दाण्याचे मोल
‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हा माधवी घारपुरे यांचा लेख वाचून खूप बरे वाटले. त्या लेखामधून अन्न कसे वाया जाऊ नये, याबद्दल सांगितले आहे. तसेच कॉलेजच्या मुलांना ते किती अन्न टाकून दिल्याने वाया घालवतात, त्यांच्यामुळे इतक्या मुलांना जेवण मिळू शकले असते हे सांगणे म्हणजे मुलांना अन्न वाया घालवू नये हे शिकवणेच. तसेच ‘बुफे’ जेवणाची पद्धत का निघाली, हॉटेलमध्ये ताटातील जेवण संपवणाऱ्या व्यक्तीच्या बिलामध्ये सवलत देऊन अन्नबचत कशी होईल याची माहितीही उपयुक्त आहे. मोठमोठ्या कार्यक्रमातील उरलेले अन्न फेकून न देता गरीबांना म्हणजे ज्यांना अन्न मिळत नाही त्यांना देऊन एक प्रकारचे पुण्यच मिळवता येते. शेतकऱ्याने पिकवलेल्या धान्याच्या प्रत्येक दाण्याचे मोल यातून सांगण्याचा खूप छान प्रयत्न केला आहे. सदर लेखातून अन्नाचे महत्त्व सांगितल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. – अलका संदीप शेटे (पुणे)
त्यांचे कर्ज केव्हा फिटणार?
‘कर्जविळखा लाडक्या बहिणींभोवती’ हा सुहास सरदेशमुख यांच्या लेखात (२३ ऑगस्ट) काही गावातील ग्रामीण भागात कर्जाने हैराण झालेल्या महिलांच्या व्यथा आहेत. असे प्रकार होत असतील तर त्यांचे कर्ज केव्हा फिटणार? वाढीव व्याज असल्याने मिळणाऱ्या पैशांतून मुद्दल, व्याज याचा ताळमेळ जुळत नाही. यावर उपाय शोधणे आवश्यक असून ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था कशी सुधारणार? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. ‘चतुरंग’ने याची घेतलेली दखल फार महत्त्वाची ठरेल. – अर्चना काळे, नाशिक.
अवयवदान सर्वश्रेष्ठ दान
शनिवार १६ ऑगस्ट २०२५ च्या अंकामधील ‘रहे ना रहे हम’ हा लेख मनस्वी आवडला. या लेखात लेखिका संपदा वागळे यांनी लिहिलेले डॉ. अन्वय मुळे यांना त्यांच्या वैद्याकीय कारकीर्दीत अवयवदानाविषयी आलेले अनुभव खरोखरच अंत:र्मुख करणारे ठरले. आजच्या धकाधकीच्या जीवनात ‘एकमेकां सहाय्य करु अवघे धरु सुपंथ’ ही संतवाणी कुठे तरी हरवून जात असल्याचे दिसत आहे, पण जर माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा आपणास मरणानंतरही जिवंत ठेवायचा असेल तर त्यास अवयवदान हा एकच उपाय असू शकतो. आणि म्हणूनच त्या संदर्भात जास्तीत जास्त जनजागृती होणे आणि त्याच बरोबर अवयवदानासंबंधातील लोकांच्या मनातील संभ्रम वा अंधश्रद्धा वेळीच दूर करणे ही काळाची गरज आहे. कारण, अवयवदान हेच सर्वश्रेष्ठ दान होय. – डॉ. प्रमोद आनंदा कांबळे शशिकला (विक्रोळी)
अन्नाला मान द्या, नासाडी थांबवा
‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हा लेख वाचला. बुफे पद्धतीने ताटात सर्व प्रकारचे अन्न घेऊन ते संपत नाही म्हणून अन्नाची नासाडी करणारे अनेक महाभाग पहावयास मिळतात, ही लेखिकेची खंत एकदम रास्त आहे. अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून अनेक संस्था, महाविद्यालये, मेस प्रयत्न करीत असल्याचे जाणवले. हा उपक्रम स्तुत्य आहे. अन्नाला परब्रह्म म्हणायचे व त्या अन्नाची नासाडी करावयाची, वाया घालवायचे हे अमानवीय आहे. केवळ ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हा श्लोक म्हणून हा विषय संपणार नाही, प्रत्येक सुज्ञ व्यक्तीने अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. हजारो लोकांचे व गरजू लोकांचे वाया जाणाऱ्या अन्नामुळे पोट भरू शकते हा संदेश लेखिकेने सप्रमाण दिला आहे तो स्तुत्य आहे. – जनार्दन कोष्टी, ठाणे</strong>
स्तुत्य उपक्रम
‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हा लेख वाचला. अन्नाचे महत्त्व सांगणारा अतिशय छान लेख वाटला. आयआयटी महाविद्यालयात अन्नाचे महत्त्व आणि त्याची जाणीवजागृती करण्यासाठी विशिष्ट आणि स्तुत्य उपक्रम राबविला जातो हे समजले. पिंपात टाकलेल्या खरकट्या अन्नाचे वजन करून, तेवढ्या अन्नामध्ये किती मुले जेवली असती हे सरळ फलकावरच लावणे, खरंच खूप छान आणि प्रशंसनीय उपक्रम आहे हा! अशाने काहीही न सांगता, न दटावता, सहजच मुलांच्या मनात अन्नाची नासाडी टाळण्याची वृत्ती जोपासली जाऊ शकते. मुळात विलक्षण कष्टातून निर्माण झालेले अन्न हे अतिशय मौल्यवान असते आणि त्याला ब्रह्म म्हणजेच परमेश्वर मानून त्याचा सन्मानाने लाभ करून घ्यायला हवा आणि इतरांनाही लाभ होऊ द्यायला हवा, तरच त्या अन्नाची आणि कष्टकऱ्याची जाण ठेवल्यासारखे होईल. – प्रतिभा राजेंद्र चव्हाण, पनवेल</strong>
अन्नसंस्कार विसरू नये
‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हा लेख खूप आवडला, पानात अन्न टाकू नये हे आपल्यावर झालेले संस्कार, पण आजकाल हे सोयीस्करपणे पुढच्या पिढ्या विसरत चालल्या आहेत. हॉटेलमध्ये किंवा बुफे पद्धतीमध्ये ताटात अन्न शिल्लक ठेवणे ही फॅशन होताना दिसत आहे. गांधीनगरमधील महाविद्यालयात जसा विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे तसा सगळीकङे व्हायला हवा आणि तसे प्रयत्न आपल्या सगळ्यांकडून व्हायला हवेत. कुलगुरू स्नेहलता देशमुख यांच्याबरोबरचा अनुभव तर फारच मनाला भिडणारा. – चित्रा काणे, पुणे
सकारात्मक जीवन जगावे
१६ ऑगस्ट २०२५ च्या अंकातील ‘पैलतीर दिसू लागला’ हा विनोद मुळ्ये यांचा लेख वाचला. आहे अगदीच खरे, पण जीवनाकडे असे एकदम उदासीन होऊ बघू नये. निवृत्तीनंतर वृत्तीत जास्त बदल करू नये. निसर्गनियमाचे भान अवश्य ठेवावे. शरीर आहे तर कुरुबुरी राहणारच. त्याकडे लक्ष द्यावे, पण दुखी न होता, असे आवर्जून सांगावेसे वाटते. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे वेळ कसा घालवावा? टाइमपास कसा करावा? लेखकाने सुचविल्याप्रमाणे आपल्या छंदाचा कोणालाही त्रास होऊ न देण्याची काळजी घ्यावी. काम कोठे थांबवावे हे ज्याच्या-त्याच्या शारीरिक /मानसिक अवस्थेवर अवलंबून असते. पैलतीर दिसत असूनही (सामान्यत: वयाची ८० ओलांडल्यावर) बरेच नेते /अभिनेते पूर्ण क्षमतेने उत्तम काम करताना आपण पाहतोच. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे महानायक अमिताभ बच्चन हे ‘कौन बनेगा करोडपती’ चे नवे पर्व पूर्ण जोशात सादर करीत आहेत. फक्त एक काम पैलतीर दिसल्यावर करावे ते म्हणजे प्रॉपर्टीचे व्यवस्थित नियोजन करावे. (Winding up) आणि मोहमाया सोडावी. छंद हा एकच विरंगुळा असल्यास आपल्यामागे कोणाला काय वाटेल? याची काळजी नसावी. सकारात्मक जीवन जगावे. – प्रभाकर शेकदार, ठाणे
हृदयद्रावक माहिती
हातमाळी गावातील तुळसाबाई म्हस्के व इतर गावकऱ्यांची आर्थिक ओढाताण व कर्जविळख्याविषयीचा ‘कर्जविळखा लाडक्या बहिणींभोवती’ हा लेख भयानक वास्तवाची जाणीव करून देणारा आहे. हे वाचून एक लक्षात येते की, येथील लोकप्रतिनिधी गावकऱ्यांकडे अजिबात लक्ष देत नाहीत का? त्या लेखात म्हटले आहे की, विविध खासगी वित्त कंपन्यांकडून भरमसाठ व्याजदराने कर्जे घेतलेली आहेत त्यामुळे गावकरी कायम कर्जाच्या विळख्यात राहतात. येथे या गावाच्या आसपास २५ ते २७ किलोमीटरवर शेंद्रा औद्याोगिक वसाहत आहे. तेथे कोणत्याही सरकारी बँका नाहीत काय की जेथून गावकरी कमी व्याजदरात कर्ज घेऊ शकतील? तसेच सरकारी प्रशासकांचेही या परिसरातील गावकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक प्रश्नांकडे लक्ष नाही का? जर या बहिणी कर्ज विळख्यात राहणार असतील तर आपल्या राज्यातल्या स्त्रियांना नुसतं लाडक्या बहिणी म्हणून काय उपयोग?
मुख्यमंत्री महोदयांनी येथील स्थानिक मंत्री/आमदारांमार्फत गावकऱ्यांची या कर्ज विळख्यातून कशी सुटका होईल व त्यांचे जीवन सुकर होईल याकडे लक्ष द्यावे. लेखकाने गावकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली यासाठी अभिनंदन. असे प्रयत्न सर्वच गावातील ग्रामस्थांसाठी होणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपले गावकरी या विळख्यातून सुटू शकतील. – सुधीर ब. देशपांडे, ठाणे
उपयुक्त मार्गदर्शन
‘हे अनारोग्य थोपवायलाच हवं’ (९ ऑगस्ट) या लेखात मंजिरी घरत यांनी केलेले निरोगी आरोग्य जोपासण्यासाठीचे मार्गदर्शन सर्वच वयोगटातील लोकांना उपयुक्त ठरेल असे आहे. घरच्या अथवा कॉर्पोरेट क्षेत्रातील कुठल्याही समारंभात, सोहळ्यात पाहुणचारासाठी वडा-पाव, समोसा, डोनट्स, पिझ्झा, केक, डेझर्ट्स हे स्नॅक्स आवडीने खाल्ले जातात. त्यामुळे अनावश्यक कॅलरीज आणि फॅट वाढून तरुणांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. ‘इंडियन कॉऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ आणि ‘नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ नुट्रीशन’ या दोन्ही संस्थांच्या अहवालानुसार भारतात २००८ पासून ते २०२०पर्यंत लठ्ठ व्यक्तींचे प्रमाण शहरी भागात ४० तर ग्रामीण भागात २३ टक्क्यांनी वाढल्याचे म्हटले आहे. सुस्त आणि आरामदायी जीवनशैलीने लठ्ठपणा वाढल्यास २०५० पर्यंत एकतृतीयांश भारतीय लठ्ठ होण्याचे संकेत दिले जात आहेत. आपल्या पाहुणचारात किंवा घरच्या आहारात मैदा, साखर, बटर, तेल, क्रीमने ठासून भरलेले केक्स, डेझर्ट्स वा अन्य गोड पदार्थांची रेलचेल असते. हे पदार्थ जरुरीपुरते खाणे हितकारक असते. आपल्या गृहकृत्यदक्ष स्त्रियांनी आहारशास्त्राच्या आधारे पौष्टिक अन्नपदार्थ बनविण्याचे आव्हान स्वीकारल्याशिवाय तरुणोपाय नाही. आरोग्यदायी नागरिकांचा लाभांश हा देश अधिक विकसित, प्रगतिशील आणि समृद्ध बनेल यात तिळमात्र शंका नाही. – अरविंद बेलवलकर, मुंबई
