एकसारखी विचारसरणी असलेले १२ विरोधी पक्ष सोमवारी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभात सहभागी होणार आहेत. या समारंभासाठी २१ राजकीय पक्षांना आमंत्रित केलं होतं. परंतु त्यापैकी काही राजकीय पक्ष सुरक्षेच्या कारणास्तव या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. यामध्ये तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, टीडीपीसह इतर काही पक्षांचा समावेश आहे, अशी माहिती एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी), एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके), तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), नितीशकुमार यांचा जनता दल (युनायटेड), सीपीआय (एम), विदुथलाई चिरुथायगल काची (व्हीसीके), केरळ काँग्रेस, फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स, मेहबूबा मुफ्ती यांची पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि शिबू सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) हे पक्ष श्रीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होतील.

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा देखील शनिवारी भारत जोडो यात्रेत भाऊ राहुल गांधी यांच्यासोबत सहभागी झाल्या. कथित सुरक्षा उल्लंघनाच्या कारणावरून शुक्रवारी भारत जोडो यात्रा रद्द केली गेली. त्यानंतर अवंतीपोरामधील चेरसू गावातून ही यात्रा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. पिपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या प्रमुख नेत्या महबुबा मुफ्ती देखील अवंतीपोरा येथे यात्रेत सहभागी झाल्या. तर दुसऱ्या बाजूला स्थानिक पोलिसांनी यात्रेदरम्यान सुरक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारची चूक झाली नसल्याचे म्हटले आहे. येथील अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी शनिवारी सर्व प्रकारचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, भारत जोडो यात्रेदरम्यान सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची चूक झालेली नाही.

खर्गे यांचं अमित शाहांना पत्र

दरम्यान, सुरक्षेच्या बाबतीत प्रशासनाने चुका केल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. ज्यात जम्मू आणि काश्मीरमधील भारत जोडो यात्रेसाठी पुरेशी सुरक्षा सुनिश्चित करावी यासाठी खर्गे यांनी अमित शाह यांना वैयक्तिक हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. खर्गे यांनी पत्रात लिहिलं आहे की, “येत्या दोन दिवसात भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होतील, तसेच ३० जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात मोठा मेळावा होईल. यात अनेक राजकीय पक्ष सहभागी होत आहेत. तुम्ही वैयक्तिकरित्या सबंधित अधिकाऱ्यांना सुरक्षेसंदर्भात सूचना केल्या तर मी तुमचा आभारी राहीन.”

हे ही वाचा >> “कालपासून जेवलो नाही, भुकेने व्याकुळलोय…”, दुकानातली मिठाई खाण्यापूर्वी चोराने लिहिलं हृदय हेलावणारं पत्र

१४५ दिवसात ३,९७० किमी प्रवास

भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबर रोजी दक्षिण भारतातून सुरू झाली. ही यात्र तब्बल १४५ दिवसांपासून सुरू आहे. यादरम्यान, राहुल गांधी यांनी १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून ३,९७० किमी पायी प्रवास केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 21 political parties invited for closing ceremony of bharat jodo yatra 9 parties with tmc will not come asc