scorecardresearch

“कालपासून जेवलो नाही, भुकेने व्याकुळलोय…”, दुकानातली मिठाई खाण्यापूर्वी चोराने लिहिलं हृदय हेलावणारं पत्र

या चोराने मिठाईच्या दुकानात शिरून मिठाई खाल्ली. तसेच दुकानातील पैशांचा गल्ला देखील तो घेऊन गेला आहे.

thief steals from sweet shop
या चोराने मिठाईच्या दुकानात शिरून मिठाई खाल्ली. तसेच दुकानातील पैशांचा गल्ला देखील तो घेऊन गेला आहे. (प्रातिनिधिक फोटो)

बऱ्याचदा काहीजण हालाकीच्या परिस्थितीमुळे चोरीचा मार्ग स्वीकारतात. अशाच एका राजस्थानमधल्या चोराला पाहुन कदाचित तुम्हाला त्याचा राग येणार नाही. या चोराने मिठाईच्या दुकानात शिरून मिठाई खाल्ली. तसेच दुकानातील पैशांचा गल्ला देखील तो घेऊन गेला आहे. परंतु ते करण्यापूर्वी चोराने दुकानदाराच्या नावाने दोन पानी पत्र लिहिलं आहे. यामध्ये चोराने स्वतःला ‘अतिथी’ म्हटलं आहे. दुसऱ्या दिवशी मिठाईच्या दुकान मालकाने या प्रकरणाची पोलिसांना माहिती दिली.

हे प्रकरण भणियाणा मुख्यालयातील बाजारात घडलं आहे. येथील मिठाईच्या दुकानात बुधवारी रात्री एक चोर भींत पाडून आत शिरला. त्यानंतर त्याने दुकानातली मिठाई खाल्ली आणि पैशांचा गल्ला घेऊन तो फरार झाला. परंतु हे करण्यापूर्वी त्याने दुकान मालकाच्या नावाने एक पत्र सोडलं आहे.

पत्रात चोराने काय लिहिलंय?

पत्रात चोराने लिहिलं आहे, “नमस्कार साहेब, मी एक चांगल्या मनाचा माणूस आहे. मी तुमच्या दुकानात चोरी करण्यासाठी नव्हे तर स्वतःची एक इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो घुसलो. मी कालपासून जेवलो नाही. मला खूप भूक लागली आहे. मी तुमच्या दुकानात पैसे चोरण्यासाठी नव्हे तर केवळ माझी भूक मिटवण्यासाठी आलो आहे.”

चोराने पत्रात दुकानदाराला उद्देशून लिहिलं आहे की, “मला माहिती आहे की, तुम्ही गरीब आहात, म्हणून दिलासा देण्यासाठी तुम्हाला हे पत्र लिहितोय. मी तुमचा पैशांचा गल्ला घेऊन जातोय. माी तुमच्या दुकानात जास्त काही खाल्लं नाही. केवळ तोन पांढऱ्या मिठाई आणि दोन पीस आग्र्याचा पेठा खाल्ला आहे. तुम्ही या चोरीसाठी पोलिसात तक्रार करू नका. तुमचा अतिथी.”

हे ही वाचा >> गर्लफ्रेंडला कारमध्ये बसवलं, निर्जन स्थळी नेलं आणि ५० लाखांची मर्सिडीज पेटवली

दुकानदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली नाही

दुसऱ्या दिवशी जेव्हा दुकनदार गोमाराम मिठाईच्या दुकानात आले तेव्हा त्यांना दुकानाची मागची भींत पडलेली दिसली. तसेच दुकानात दोन पानांचं पत्र देखील मिळालं. त्यानंतर गोमाराम यांनी पोलिसांना या चोरीची माहिती दिली. चोरीची माहिती मिळताच भणियाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी अशोक कुमार घटनास्थळी पोहोचले. आता पोलीस चोराचा तपास करत आहेत. गोमाराम यांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. परंतु पोलीस चोराचा शोध घेत आहेत. चोर अद्याप फरार आहे.

चोराला केवळ सफरचंद हवं होतं

खरंतर चोर बाजूच्या भाज्यांच्या दुकानात घुसला होता. त्याला सफरचंद हवं होतं. ते मिळालं नाही म्हणून तो मिठाईच्या दुकानात शिरला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 18:00 IST