AAP VS BJP Politics : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागलं. दिल्लीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं, तर ‘आप’ला फक्त २२ जागांवर समाधान मानावं लागलं. आता दिल्लीत भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे. दरम्यान, दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तथा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झाल्यामुळे पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. असं असतानाच अरविंद केजरीवाल यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आम आदमी पक्षाच्या ३ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये अनिता बसोया, नगरसेवक धर्मवीर, नगरसेवक निखिल चपराना यांचा समावेश आहे. भाजपाचे दिल्लीचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे भाजपा दिल्लीच्या महापौर पदासाठी पक्षाची ताकद वाढवण्याच्या हालचाली करत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दिल्ली महानगरपालिकेचे (एमसीडी) समीकरण बदलणार का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

दरम्यान, दिल्ली महापालिकेच्या महापौरपदासाठी एप्रिलमध्ये निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आतापासून आपली संख्या वाढवण्यासाठी ताकद पणाला लावत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता आम आदमी पक्षाच्या ३ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे दिल्ली महापालिकेत भाजपाच्या नगरसेवकांच्या संख्याबळात वाढ झाली आहे. त्यामुळे आता एप्रिलमध्ये महापौरपदासाठी होणारी निवडणूक ही महत्वाची ठरण्याची शक्यता आहे.

वीरेंद्र सचदेवा काय म्हणाले?

“दिल्लीला विकसित भारत अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेची राजधानी म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र, विधानसभा आणि नगरपालिका स्तरावर योग्यवेळी ट्रिपल इंजिन सरकार असेल. दिल्ली स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्यासाठी आज तीन नगरसेवक भाजपात सामील झाले आहेत”, असं वीरेंद्र सचदेवा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे.

दिल्लीत भाजपा आणि ‘आप’ला किती जागा मिळाल्या?

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. या निकालात भारतीय जनता पक्षाने ७० पैकी ४८ जागा जिंकल्या, तर आम आदमी पक्षाने २२ जागा जिंकल्या. तसेच काँग्रेसला ७० पैकी एकही जागा निवडून आणता आली नाही. तसेच आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap vs bjp mcd number game politics another blow to arvind kejriwal entry of three corporators of aam aadmi party into bjp gkt