Air India plane crash : २४२ प्रवासी आणि कर्मचार्‍यांना घेऊन लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादच्या मेघानी भागात गुरूवारी दुपारी कोसळल्याची घटना घडली आहे. बोईंग ड्रीमलायनर या विमानाने दुपारी १.४७ वाजता उड्डाण केले होते. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार उड्डाणासाठी परवानगी दिली गेल्यानंतर ९ मिनिटांनी हे विमान कोसळल्याची भीषण घटना घडली. या दुर्घटनेचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अपघात स्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत.

दरम्यान या दुर्घटनेचे वृत्त समोर येताच राजकीय क्षेत्रातून याबद्दल प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

“अहमदाबाद येथील दुर्घटनेने आपल्याला धक्का बसला असून अतिव दुख: झाले आहे. हे दुखः शब्दात सांगता येणार नाही. या दु:खाच्या क्षणी या घटनेने प्रभावित झालेल्या प्रत्येकाबाबत माझ्या संवेदना व्यक्त करतो. बाधितांना मदत करण्यासाठी काम करत असलेले मंत्री आणि अधिकारी यांच्या संपर्कात आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सवर केलेल्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या घटनेबद्दल दुखः व्यक्त केले आहे. “अहमदाबाद येथील दुर्दैवी विमान अपघाताची वेदना शब्दांत व्यक्त करता येण्याच्या पलीकडची आहे. आपत्ती प्रतिसाद दलांना तातडीने दुर्घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृहमंत्री हर्ष संघवी आणि अहमदाबादचे पोलीस आयुक्त यांच्याशी संवाद साधला,” असे देशाचे गृहमंत्री अमित शाह म्हणाले आहेत.

“अहमदाबाद येथील एअर इंडिया विमान अपघात हा हृदयद्रावक आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना होत असलेल्या वेदना आणि त्यांची चिंता याची कल्पना करता येणार नाही. प्रशासनाकडून ताबडतोब बचाव आणि मदत करणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक जीव महत्त्वाचा असून प्रत्येक सेकंद महत्त्वपूर्ण आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना घटनास्थळी शक्य असेल ती मदत करावी,” असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

“अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाच्या प्रवासी विमान घटनेबद्दल जाणून दुःख वाटले आणि धक्का बसला. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना,” अशी पोस्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

“अहमदाबाद विमान दुर्घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त खूपच दु:खद आणि अत्यंत वेदनादायी आहे. पीडित कुटुंबांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करते. परमेश्वर त्यांना दुखः सहन करण्याची शक्ती देवो, असे बीएसपीच्या नेत्या मायावती एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानात १६९ भारतीय प्रवासी, तर ५३ ब्रिटिश नागरिक प्रवासी तसेच कॅनडामधील १ आणि पोर्तुगालमधील ७ प्रवासी देखील विमानात होते अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर हे विमान अहमदाबादमध्ये उतरलं होतं. काही प्रवाशांना घेऊन या विमानाने लंडनसाठी उड्डाण केलं. मात्र उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांमध्येच हे विमान कोसळलं.