पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा पराभव करण्यासाठी काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीने २६ पक्षांची मोट बांधली होती. या आघाडीला इंडिया आघाडी असे नाव देण्यात आले. मात्र लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच जागा वाटपाच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीतील मतभेद उघड होत आहेत. नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) पक्षाने बिहारमध्ये थेट भाजपाबरोबर सरकार स्थापन करून आघाडीला पहिला धक्का दिला. त्यानंतर ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसशी जागावाटपावरून मतभेद असल्याचे उघड केले. त्यानंतर आता जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स या पक्षानेही स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष संपादकीय : फिटे अंधाराचे जाळे

नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. तसेच लोकसभा निवडणुकीबरोबरच जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांचीही घोषणा होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेत बोलत असताना अब्दुल्ला म्हणाले, “जागावाटपाचा प्रश्नच येत नाही, नॅशनल कॉन्फरन्स पक्ष निःसंशय स्वबळावर निवडणूक लढविणार आहे.”

या महिन्याच्या सुरुवातीलाच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये आप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे सांगितले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील जागावाटपाबाबत काँग्रेशसी कोणतीही चर्चा होणार नसल्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी भगवंत मान यांनी स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते.

एनडीएबरोबर जाण्याचे संकेत?

फारूख अब्दुल्ला यांनी नुकतीच इंडिया टुडे वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत फारूख अब्दुल्ला म्हणाले की, इंडिया आघाडीतील जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरलेली आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत आहोत, असे फारूख अब्दुल्ला यांनी जाहीर केले होते. तसेच एनडीए आघाडीत परतण्याच्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली नाही. तसेच याचा विरोधही केला नाही. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात नॅशनल कॉन्फरन्स पक्ष एनडीएचा घटक पक्ष होता.

मागच्या महिन्यात नॅशनल कॉन्फरन्सचे काही महत्त्वाचे नेते यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्या पार्श्वभूमीवर फारूख अब्दुल्ला यांनी मोठा निर्णय घेतल्याचे मानले जाते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांनी प्रत्येकी तीन जागा जिंकल्या होत्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another setback for india bloc farooq abdullahs party to fight alone in jammu and kashmir kvg