“पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४मध्ये जिंकले खरे, पण २०२४मध्ये…”, शपथविधीनंतर नितीश कुमार यांचा खोचक टोला!

नितीश कुमार म्हणतात, “निवडणूक काळात भाजपाचं वागणं योग्य नव्हतं. आमच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. पण त्यांच्याकडून जदयूला हरवण्यासाठीच प्रयत्न केले गेले.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४मध्ये जिंकले खरे, पण २०२४मध्ये…”, शपथविधीनंतर नितीश कुमार यांचा खोचक टोला!
नितीश कुमार यांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान?

बिहारमध्ये झालेल्या राजकीय भूकंपानंतर जदयुचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राजदचे तेजस्वी यादव यांचा देखील शपथविधी पार पडला आहे. भाजपाशी काडीमोड घेऊन राजदशी संसार थाटत नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा राजकारणात काहीही अशक्य नसल्याचंच दाखवून दिलं आहे. २०१७मध्ये “काहीही झालं तरी राजदसोबत जाणार नाही” म्हणणारे नितीश कुमार आज त्यांच्याच पाठिंब्यावर पुन्हा मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जाहीर आव्हान दिलं आहे.

…म्हणून भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला

नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. खुद्द भाजपामधून यासंदर्भात सुरुवातीला आश्चर्य वाटल्याच्या प्रतिक्रिया आल्या. त्यापुढे राजदशी हातमिळवणी केल्यानंतर नितीश कुमार यांच्यावर भाजपानं जोरदार टीका केली. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडण्याचं नेमकं कारण काय ठरलं? याविषयी तर्क लावले जाऊ लागले होते. यासंदर्भात आता खुद्द नितीश कुमार यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

“निवडणूक काळात त्यांचं (भाजपा) वागणं योग्य नव्हतं. आमच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. पण त्यांच्याकडून जदयूला हरवण्यासाठीच प्रयत्न केले गेले. मी आमच्या पक्षातील सर्वांशी चर्चा केली. सगळ्यांच्याच मनात या आघाडीत राहायला नको हीच भावना होती. म्हणून भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला”, असं नितीश कुमार म्हणाले आहेत.

Video : नितीश कुमार यांचा जुना व्हिडीओ व्हायरल; भर विधानसभेतच राजदला ठणकावून म्हणाले होते, “काहीही झालं तरी…”

वाजपेयींबद्दल व्यक्त केला आदर

दरम्यान, यावेळी बोलताना नितीश कुमार यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी आदर व्यक्त केला. “अटल बिहारी वाजपेयींकडे आम्ही सगळे गेलो होतो. ते आम्हाला फार मानत होते. आम्ही ते कधीही विसरू शकत नाही. वाजपेयी आणि इतरांनी दिलेलं प्रेम आम्ही विसरू शकत नाही”, असं नितीश कुमार यांनी नमूद केलं.

पंतप्रधान पदासाठी दावेदारी नाही

नितीश कुमार यांनी भाजपाशी आघाडी तोडून राज्यात नवं सरकार स्थापन केल्यानंतर त्यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देणारा विरोधी पक्षांचा चेहरा म्हणून पाहिलं जाऊ लागलं होतं. २०२४मध्ये ते मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची देखील चर्चा रंगली होती. मात्र, पंतप्रधान पदाच्या उमेदवारीमध्ये आपल्याला रस नसल्याचं नितीश कुमार यावेळी म्हणाले.

विश्लेषण : धरसोड वृत्तीमुळे नितीशकुमार यांचा राजकीय फायदा की तोटा?

“२०२४ सालच्या कोणत्याही पदासाठी आमची दावेदारी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४मध्ये जिंकले, पण २०२४ मध्ये ते जिंकतील का?”, अशा शब्दांत नितीश कुमार यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आव्हान दिल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण: चीनने वाढवली जगाची चिंता! करोनानंतर आता लांग्या व्हायरस, प्राण्यांपासून माणसांना लागण?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी