एकीकडे महाराष्ट्रात राजकीय भूकंपानंतर स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होत असताना दुसरीकडे बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपासोबतच्या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तेवढ्याच वेगवान राजकीय घडामोडींनंतर त्यांनी राजदसोबत सरकार स्थापनेचा दावा देखील केला. आता पुन्हा एकादा नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. बिहारमधील या राजकीय नाट्यासंदर्भात सोशल मीडियावर मीम्स तुफान व्हायरल होत आहेत. यामध्ये नितीश कुमार यांनी सातत्याने आघाडी-बिघाडीचं राजकारण केल्याचा मुद्दा चर्चेत असताना आता नितीश कुमार यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.
गेल्या निवडणुकीमध्ये नितीश कुमार यांनी राजदशी आघाडी करून भाजपाला आव्हान दिलं होतं. या निवडणुका जिंकल्यानंतर जदयु आणि राजद यांचं सरकार सुद्धा स्थापन झालं. मात्र, त्यानंतर या दोघांमध्ये मतभेद विकोपाला गेले आणि नितीश कुमार यांनी राजदसोबत आघाडी तोडत भाजपाशी सवतासुभा केला. यानंतर नितीश कुमार यांनी बिहारच्या विधानसभेत केलेल्या भाषणामध्ये समोरच्या बाकांवर बसलेल्या राजदला ठणकावून पुन्हा सोबत येणार नसल्याचा ठाम दावा केला होता. मात्र, आता पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी राजदसोबत सरकार स्थापन केल्यामुळे हा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.




यासंदर्भात नितीश कुमार यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. महाराष्ट्रातील भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी नितीश कुमार यांना टोला लगावत हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. “नितीश कुमार, पलटीमार..” असं या ट्वीटमध्ये भातखळकर यांनी लिहिलं आहे.
काय म्हणतायत नितीश कुमार?
हा व्हिडीओ बिहारच्या विधानसभेतला असून भाजपासोबत सरकार स्थापन केल्यानंतर नितीश कुमार विरोधी बाकांवर बसलेल्या राजदला उद्देशून आक्रमकपणे भाषण करताना दिसत आहेत. “यानंतर कोणत्याही परिस्थितीत परत जाण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही सत्तेत राहू किंवा खड्ड्यात जाऊ. पण तुम्हा लोकांसोबत आम्ही भविष्यात कोणतीही तडजोड करणार नाही. हे आता शक्यच नाही. ते प्रकरण आता संपलं आहे. कारण तुम्ही विश्वास तोडला आहे”, असं नितीश कुमार व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.
दरम्यान, आज दुपारी नितीश कुमार यांचा राजदच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्यानंतर शपथविधी होणार आहे.