Nishikant Dubey News : भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे हे गेल्या काही दिवसांपासून कोणत्या न कोणत्या कारणांनी चांगलेच चर्चेत आहेत. यातच आता निशिकांत दुबे यांनी भारतीय जनता पक्षाबाबत केलेल्या एका विधानाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. त्यामुळे दुबे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाची मजबुरी असल्याचं दुबे यांनी म्हटलं आहे. तसेच ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे नेते नसतील तर भाजपा १५० जागा देखील जिंकू शकणार नाही’, असं निशिकांत दुबे यांनी म्हटलं आहे.

निशिकांत दुबे काय म्हणाले?

एएनआय वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टचा टीझर रिलीज झाला आहे. पूर्ण व्हिडीओ अद्याप आलेला नाही. पण या पॉडकास्टमध्ये बोलताना निशिकांत दुबे यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी निशिकांत दुबे यांना त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्याबाबत केलेल्या एका टिप्पणीबाबत प्रश्न विचारण्यात आला. दिल्लीत एकही जागा रिकामी नाही असं त्यांनी विधान केलं होतं. त्यांच्या याच विधानावरून त्यांना आता प्रश्न विचारण्यात आला.

यावर उत्तर देताना निशिकांत दुबे म्हणाले की, “मला वाटतं की पुढील १५ ते २० वर्षांसाठी दिल्लीत फक्त मोदीच आहेत असं वाटतं. जर नरेंद्र मोदी आमचे नेते नसतील तर भारतीय जनता पक्ष १५० जागाही जिंकू शकणार नाही. भारतीय जनता पक्षाची ही मजबुरी आहे की २०२९ ची लोकसभेची निवडणूक देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात लढावी लागेल”, असं निशिकांत दुबे यांनी म्हटलं आहे.

‘भाजपाला मोदींची गरज, पण मोदींना नाही’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी ७५ व्या वर्षी निवृत्त होण्याबाबत एक विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावरून निशिकांत दुबे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर खासदार दुबे म्हणाले की, “आज मोदींना भाजपाची गरज नाही, तर भाजपाला मोदींची गरज आहे. तुम्ही सहमत असाल किंवा असहमत असाल. मात्र, राजकीय पक्ष व्यक्तिमत्त्वाच्या आधारावर चालतो”, असंही निशिकांत दुबे यांनी म्हटलं आहे.

‘बांगलादेश निर्माण करणं इंदिरा गांधींची चूक होती’ : निशिकांत दुबे

निशिकांत दुबे यांना बांगलादेशाबाबत प्रश्न विचारला असता दुबे म्हणाले की, “इंदिरा गांधींनी बांगलादेश निर्माण करून केलेल्या चुकीचे परिणाम बिहारी भोगत आहेत. जर बांगलादेश निर्माण करायचा होता तर हिंदू बांगलादेश वेगळा आणि मुस्लिम बांगलादेश वेगळा निर्माण करायला हवा होता”, असं निशिकांत दुबे यांनी म्हटलं आहे.