Prashan Kishor on Bihar Political Crises : नितीश कुमारांनी बिहारमध्ये असलेली महागठबंधन तोडून एनडीएत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असून भाजपाच्या पाठिंब्याचं पत्रही राज्यपालांना सुपूर्द केलं आहे. त्यानुसार, येत्या काही वेळात नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी विराजमान होणार आहेत. इंडिया आघाडीची मोट बांधण्यात आघाडीवर असलेल्या नितीश कुमारांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आघाडीला डच्चू दिल्याने त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका केली जातेय. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही नितीश कुमारांवर टीकास्र डागलं आहे. बेगुसराच्या जी. डी महाविद्यालयात आज पत्रकार परिषदेत प्रशांत किशोर बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“गेल्या वर्षभरापासून सांगतोय की नितीश कुमार कोणत्याही वेळी पलटी मारू शकतात. अशी वक्तव्ये मी सातत्याने कॅमेरासमोर करतोय. लोकांना माहितेय की नितीश कुमार पलटूराम आणि पलटूरामांचे सरदार आहेत”, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली.

हेही वाचा >> ठरलं! बिहारमध्ये एनडीएचा प्रस्ताव राज्यपालांनी स्वीकारला, शपथविधीसाठी आमंत्रण; नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार?

“आज हे सुद्धा सिद्ध झालं की नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपावाले तितकेच पलटूराम आहेत, जितके नितीश कुमार आहेत. भाजपा चार महिन्यांआधी म्हणत होतं की बिहारमध्ये नितीश कुमारांसाठी भाजपाचा दरवाजा बंद आहे, परंतु, त्यांनी आता हाच दरवाजा नितीश कुमारांसाठी उघडला आहे. कालपर्यंत ज्या नितीश कुमार यांना भाजपा समर्थक शिव्या घालत होते, आज त्यांनाच सुशासनाचे प्रणेते म्हणत आहेत”, असाही टोला त्यांनी लगावला.

नितीश कुमारांचा राजीनामा

नितीश कुमार यांनी राजदशी असलेली आपली युती तोडली असून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाआघाडीच्या रुपात संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि डावे सत्तेत होते. मात्र, नितीश कुमार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे बिहारमधील सरकार आपोआपच बरखास्त झाले आहे. भाजपाने नितीश कुमार यांना पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा मिळताच नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

हेही वाचा >> “कचरा पुन्हा कचराकुंडीत…”, लालू प्रसाद यादव यांच्या मुलीची नितीश कुमारांवर टीका

राजदला आणखी ४३ आमदारांची गरज

याआधी नितीश कुमार यांनी २०२२ मध्ये भाजपाशी असलेली युती तोडत राजदला सोबत घेत बिहारमध्ये सरकारची स्थापना केली होती. बिहारच्या विधानसभेतील एकूण २४३ आमदारांत राजदचे ७९ आमदार आहेत. बहुमताचा १२२ चा आकडा पार करण्यासाठी राजदला आणखी ४३ आमदारांची गरज आहे. बिहारमध्ये भाजपा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा पक्ष आहे. भाजपाचे सध्या ७८ आमदार आहेत.

जदयू आणि भाजपा एकत्र

जदयू आणि भाजपा एकत्र आले तर त्यांच्या आमदारांची संख्या १२३ होते. हा आकडा बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे. भाजपाला हिंदुस्तानी आवाम मोर्चा या पक्षाचा पाठिंबा आहे. म्हणजेच या पक्षाचे चार आमदार हे नितीश कुमार आणि भाजपाच्या बाजूने असतील. म्हणजेच नितीश कुमार आणि भाजपा यांना एकत्र येऊन सरकार स्थापन करणे फार अडचणीचे ठरणार नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp supporters abusing nitish kumar today prashant kishors said sardar of palturam sgk
First published on: 28-01-2024 at 16:13 IST