Mallikarjun Kharge Targets BJP Leaders Over Maha Kumbh 2025 holy dip In Ganga : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ २०२५ मध्ये गंगेत स्नान करणाऱ्या भाजपा नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. खरगे हे मध्य प्रदेशमधील महू येथे ‘जय बापू, जय भीम, जय संविधान रॅली’मध्ये बोलत होते. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात गंगा नदीत स्नान केले होते. या पार्श्वभूमीवर टीका करताना खरगे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरगे नेमकं काय म्हणाले?

सभेला संबोधित करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, “अरे भाई, गंगेत डुबकी घेतल्याने गरिबी दूर होते का? तुम्हाला पोटासाठी अन्न मिळतं का?”. पण ताबडतोब त्यांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल माफी मागितली.

“मला कोणाच्याही धार्मिक भावना दुखावायच्या नाहीत. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. पण मला सांगा एखादा मुलगा उपाशी मरत असेल, तो शाळेत जाऊ शकत नसेल, मजुरांना मजूरी मिळत नसेल… अशा परिस्थितीत ते (भाजप नेते) हजारो रुपये खर्च करत आहेत आणि चढाओढीने डुबक्या घेत आहेत”, असे खरगे म्हणाले.

भाजपा नेत्यांवर टीका करताना खरगे म्हणाले की, “जोपर्यंत टीव्हीवर व्यवस्थित दिसत नाहीत तोपर्यंत ते डुबकी घेत राहतात”. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना खरगे म्हणाले की, “मोदी-शाह यांनी एकत्र इतकी पापं केली आहेत की ते पुढील १०० जन्म घेतले तरी ते स्वर्गात जाणार नाहीत. लोकांच्या शापांमुळे ते नरकात जातील”.

भाजपाचे जोरदार प्रत्युत्तर

दरम्यान भाजपाने खरगे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. भाजापाचे नेते संबीत पात्रा म्हणाले की, “महाकुंभ कोट्यवधी वर्षांपासून सनातन आस्थेचं प्रतिक आहे. काँग्रेस पक्ष आणि त्यांचे अध्यक्ष त्याची टिंगल करत आहेत. महाकुंभ स्नान याबद्दल मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेलं विधान अत्यंत लज्जास्पद आहे. इफ्तार पार्टी आणि हज यात्रेबद्दलही काँग्रेस पक्ष असं लाजिरवाणं विधान करू शकते का?”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mallikarjun kharge targets bjp leaders over holy dip in ganga during maha kumbh 2025 bjp hits back video rak