केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या प्रश्नावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुरुवारी निशाणा साधला. “देशाचा कारभार संविधानाने चालतो, त्यामुळे कोणी भोंगे काढण्याची, भोंगे वाजविण्याची विधाने करून समाजासमाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. धर्माधर्मात तेढ निर्माण करू नये,” असा सल्लाही आठवलेंनी दिला. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नाशिकमधील देवळाली कॅम्प येथे आयोजित सभेत ते बोलताना आठवलेंनी राज ठाकरेंना उद्देशून केलेल्या वक्तव्यांवरुन काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया देताना आठवलेंना राज ठाकरेंबद्दल केलेल्या टीकेतील काही गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही सांगाव्यात असा खोचक टोला लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“भगवा रंग गौतम बुद्धांचा आहे. बुद्ध आणि भगवा रंग शांततेचा आहे. राज ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले असल्याने वाद करण्यापेक्षा वाद मिटविण्याचे काम करावे. अंगावर भगवा घेतल्यावर वाद नको,” असंही ते म्हणाले आहे. याच मुद्द्यावरुन महाराष्ट्र काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया देताना आठवलेंना एक सल्ला दिलाय.

ट्विटरवरुन लोकसत्ताची बातमी रिट्विट करुन कोट करताना सावंत यांनी आठवलेंनी संविधानाबद्दल केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर हे मोदींनाही सांगावं असा सल्ला दिलाय. “मनसेचे कान सोनाराने टोचले हे चांगले झाले. अशीच कानटोचणी आठवले साहेबांनी भाजपा व संघाच्या नेत्यांची करावी. मंत्रीमंडळ बैठकीत मोदींना सांगितले तरी चालेल,” असं सावंत यांनी म्हटलंय.

दरम्यान, गुरुवारी बोलताना भोंग्याच्या मुद्यावरून आठवले यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यास उत्तर प्रदेशमधून विरोध होत आहे. भाजपाच्या एका खासदाराने राज यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. या संदर्भात आठवले यांनी राज यांच्या अयोध्या जाण्याला विरोध नाही, पण उत्तर भारतीयांची त्यांनी माफी मागावी, असे सूचित केले.

रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांनी एकत्र आल्यास पक्षाचे प्रतिनिधित्व दिल्लीसह राज्यात निर्माण होईल. यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारायला आपण तयार आहोत. शिवाय आपला प्रवास पँथर ते रिपब्लिकन पक्ष असा झालेला असून रक्ताच्या शेवटपर्यंत रिपाइंतच राहू, असे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress sachin sawant on ramdas athawale criticizing mns raj thackeray scsg