संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि आगामी लोकसभआ निवडणुकीची रंगीत तालिम समजल्या जाणा-या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी सुरूवात झाल्यानंतर सायांकाळ होईपर्यंत ६२ टक्के मतदान झाले. यावेळी दिल्लीत विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे ‘भाजप’ आणि ‘आप’च्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. कारण, जनता काँग्रेसला वैतागली असल्यानेच यावेळी घराघरातून प्रत्येक जण मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी बाहेर पडला आणि मतदान केले असल्याचे भाजप आणि इतर विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.  सकाळच्या सत्रात सर्व राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि आपलाच पक्ष सत्तेत येणार असल्याचे सुतोवाच केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

दिल्लीतील मतदारांनीही मोठ्या उत्साहात मतदान केंद्राबाहेर रांगा लागलेल्या दिसत आहेत. छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील विक्रमी मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष दिल्लीकडे लागून राहिले आहे. मतदानाला सुरूवात होताच आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांनी कनॉट प्लेसमधील एनडीएमसी शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. तर भाजपचे मुख्यमंत्री पदाचे पदाचे उमेदवार डॉ हर्षवर्धन यांनीही कृष्णानगर येथील केंद्रावर जाऊन मतदान केले. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दिक्षित, कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही मतदान केले.   

 

दिल्लीत एकूण १.२३ कोटी मतदार आहेत. त्यापैकी ६८.५ लाख पुरुष तर ५४ लाख महिला मतदार आहेत. निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर आज मंगळवापर्यंत सुमारे ७ हजार ५६५ लिटर मद्य निवडणूक आयोगाच्या पथकाने जप्त केले आहे. याशिवाय १ कोटी ३१ लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.  मतदानाची एकूण टक्केवारी २००८ च्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi assembly polls live sonia kejriwal cast votes as polling underway