Delhi Red Fort Metro Station Delhi Blast Updates : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ च्या बाहेर भीषण स्फोट झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेत किमान ९ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर परिसरातील काही वाहनांनी पेट घेतला होता. या स्फोटाच्या घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर आता या संपूर्ण घटनेचा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर देशभरातील अनेक महत्वाच्या शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई, कोलकाता, हैदराबाद, डेहराडूनमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच बिहार, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमधील काही महत्वाच्या शहरांत देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर दिल्ली पोलीस, पोलिसांची विशेष पथकांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. स्फोटानंतर, दिल्ली मेट्रो स्थानक, लाल किल्ला, प्रमुख सरकारी इमारती आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावरही अधिक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. तसेच हरियाणामध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरियाणा सरकारने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून दिल्लीच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये विशेष दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत.
हरियाणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार, गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी आणि ऐतिहासिक स्थळांवर अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानंतर उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. तसेच नोएडा सीमेवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
