Delhi Red Fort Blast Updates: दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी एका कारमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत तब्बल ९ जणांचा मृत्यू झाला असून २२ पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, स्फोटाच्या घटनेनंतर दिल्लीत मोठी खळबळ उडाली असून या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण घटनेचा आढावा देखील घेतला आहे.

दिल्लीतील स्फोटाच्या घटनेवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘दिल्ली स्फोटातील दोषींना सोडलं जाणार नाही’, असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला आहे. तसेच दिल्लीतील स्फोटाच्या घटनेची चौकशी सुरू असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

राजनाथ सिंह काय म्हणाले?

“मी माझ्या देशवासीयांना खात्री देतो की, देशातील आघाडीच्या तपास यंत्रणा या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. या घटनेच्या तपासाचे निष्कर्ष लवकरच सार्वजनिक केले जातील. मी देशाला खात्री देऊ इच्छितो की दिल्ली स्फोटाच्या घटनेत दोषी असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही”, असं राजनाथ सिंह यांनी मंगळवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं. तसेच या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांप्रती मनापासून शोक व्यक्त करतो, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

https://x.com/i/broadcasts/1kvKpMnaBkgGE

पंतप्रधान मोदींनी काय इशारा दिला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतान दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान भूतानमधील उच्चपदस्थांशी त्यांच्या सविस्तर बैठका होणार आहेत. मोदींनी भूतानमध्ये केलेल्या भाषणात दिल्ली स्फोटावर शोक व्यक्त केला. तसेच, या कट-कारस्थानामागील व्यक्तींना भारत सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत असं ते म्हणाले. “भूतानमध्ये आज या प्रसंगी सहभागी होणं भारत व माझी बांधिलकी होती. पण आज मी इथे खूप भावनिक होऊन आलो आहे. काल संध्याकाळी दिल्लीत घडलेल्या भयावह घटनेनं सगळ्यांना दु:खी केलं आहे. मी पीडित कुटुंबीयांचं दु:ख समजू शकतो. आज आख्खा देश त्यांच्यासोबत उभा आहे”, असं मोदी म्हणाले.

“मी काल रात्रभर या घटनेचा तपास करणाऱ्या सर्व यंत्रणा, महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या संपर्कात होतो. चर्चा चालू होती. माहितीची देवाण-घेवाण चालू होती. आमच्या तपास यंत्रणा या कारस्थानाच्या मुळापर्यंत जातील. हे कारस्थान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. जे कुणी या घटनेसाठी जबाबदार आहेत, त्यांना अद्दल घडवली जाईल”, असा ठाम निर्धार यावेळी नरेंद्र मोदींनी बोलून दाखवला.