IIT Mumbai Alumna X Post: अमेरिकेने एच-१बी व्हिसाचे शुल्क १ लाख रुपयांपर्यंत वाढवल्यानंतर तिथे काम करणारे असंख्य भारतीय चिंतेत आहेत. अशात केंद्र सरकारने परदेशात असलेल्या प्रतिभावान भारतीय नोकरदारांना मायदेशात परतण्याचे आणि देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावण्याचे आवाहन केले आहे. सरकारने परदेशातील भारतीय नोकरदारांना परत येण्याचे आवाहन पुन्हा सुरू केल्यानंतर आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थिनी आणि प्राध्यापिका डॉ. राजेश्वरी अय्यर यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये यावर तीव्र आक्षेप व्यक्त केले आहेत.

एक्सवरील एका पोस्टमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव पी. के. मिश्रा यांनी परदेशात काम करणाऱ्या भारतीयांनी मायदेशात येण्याचे आवाहन केल्याचे म्हटले होते. ही पोस्ट रिपोस्ट करताना डॉ. राजेश्वरी अय्यर यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

डॉ. राजेश्वरी अय्यर म्हणाल्या की, “हा सरकारचा सापळा आहे. आम्ही परत आलो की ते समाजकल्याणाच्या नावाखाली सर्व काही काढून घेतील आणि त्या बदल्यात काहीही देणार नाहीत. खड्डेमय रस्त्यांवर तुमचा जीव जाऊ शकतो आणि तुमचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांना लाच द्यावी लागू शकते.”

एकही एनआरआय मायदेशी परतण्यास तयार नाही

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुदुचेरीच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या डॉ. राजेश्वरी अय्यर या अनिवासी भारतीय आहेत. त्या सोशल मीडियावर सातत्याने विविध मुद्द्यांवर भाष्य करत असतात.

गेल्या महिन्यात एक्सवर लिहिलेल्या सविस्तर पोस्टमध्ये डॉ. राजेश्वरी अय्यर म्हणाल्या होत्या की, “वाढते कर आणि सुरक्षिततेच्या चिंतेमुळे अनिवासी भारतीय आधीच ब्रिटन सोडत आहेत आणि आता अमेरिकेतही एच-१बी शुल्कात वाढ झाल्याने बरेच लोक अमेरिकाही सोडत आहेत. ते दुबई, सिंगापूर, जपान, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड आणि नॉर्डिक देशांमध्ये स्थलांतरित होत आहेत जे सुरक्षा, गुणवत्तेवर आधारित संधी आणि चांगल्या दर्जाचे जीवनमान देण्याचे आश्वासन देतात. दरम्यान, एकही अनिवासी भारतीय पुन्हा मायदेशी परतण्याचा विचारही करत नाही. का? हाच प्रश्न आहे ज्याचे उत्तर आपल्याला शोधण्याची गरज आहे.”