Eknath Shinde vs Shivsena : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना आमदारांची संख्या वाढतच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थक आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर आता तर शिंदे गटाने विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांच्या नियुक्तीचं पत्र दिलं. तसेच गुवाहाटीतून आमदारांच्या पाठिंब्याचे फोटो, व्हिडीओ, पत्र जारी केले. यानंतर महाविकासआघाडीतील ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक होत शिंदे गटाला बहुमत गुवाहटीतून नाही, तर मुंबईत येऊन विधीमंडळात सिद्ध करावं लागेल, असं सांगत सूचक इशारा दिला. या पार्श्वभूमीवर आज दिवसभरातील घडामोडींच्या प्रत्येक अपडेट्सचा आढावा.

Live Updates

Maharashtra Political Crisis Live Updates : महाराष्ट्रातील राजकीय संकट चौथ्या दिवशीही कायम, वाचा प्रत्येक अपडेट… | Read in English

14:19 (IST) 24 Jun 2022
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचं नागपूरमध्ये आंदोलन

नागपूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या ट्वीट विरोधात नागपुरात राष्ट्रवादीच्या कार्यर्त्यांनी आंदोलन करत निषेध नोंदवला. राष्ट्रवादीच्यावतीने शहर अध्यक्ष दूनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात नागपुरातील व्हेरायटी चौक सिताबर्डी नागपूर येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. नारायण राणे यांच्या बॅनरला जोडे मारून आपला राग व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर शहर अध्यक्ष दूनेश्वर पेठे यांनी यावेळी राणेंचा निषेध नोंदवला.

14:03 (IST) 24 Jun 2022
“त्यावेळी माझ्या राजसाहेबांचे नगरसेवक फोडलेत, आता कसं वाटतंय?”; मनसेची शिवसेनेविरोधात बॅनरबाजी

मुंबई – एकीकडे शिवसेनेत उभी फूट पडली असताना मनसेने शिवसेनेची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली आहे. मनसेचे चांदीवली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी शिवसेनेला “त्यावेळी माझ्या राजसाहेबांचे नगरसेवक फोडलेत, आता कसं वाटतंय?” असा प्रश्न विचारला आहे. मुंबई मनपामध्ये मनसेचे ७ नगरसेवक असताना शिवसेनेने त्यातील ६ नगरसेवकांचा गट फोडला होता. आता शिवसेनेतून त्याच्या सहा पट आमदारांचा गट फुटल्याने मनसेतर्फे त्यांना 'जे पेरले ते उगवले' असा टोला लगावण्यात येत आहे.

13:56 (IST) 24 Jun 2022
‘नको टरबुजा, नको खरबुजा’, असे फलक घेत मातोश्री बाहेर राष्ट्रवादीचे भाजपाविरोधात आंदोलन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष विद्या चव्हाण यांनी भाजपा विरोधात आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते देखील आंदोलनात सहभागी झाले. 'नको टरबुजा, नको खरबुजा', असे फलक घेऊन भाजपा विरोधात आंदोलन करण्यात आलं.

13:50 (IST) 24 Jun 2022
बीडमधील शिंदे समर्थनार्थ लावलेले बॅनर्स उतरवले

बीड – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बीडमध्ये लावण्यात आलेले बॅनर्स अखेर उतरविण्यात आले. बीड शहरातील शासकीय विश्रामगृह आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर हे बॅनर्स लावण्यात आले होते. या बॅनरमुळे कोणताही वाद घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली. आम्ही भाई समर्थक असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला होता. विजयराज काटे या शिवसैनिकाने हे बॅनर्स लावले होते.

13:43 (IST) 24 Jun 2022
आदित्य ठाकरे बैठकीसाठी शिवसेना भवन येथे दाखल

आदित्य ठाकरे बैठकीसाठी शिवसेना भवन येथे दाखल, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होणार, शिवसेनेचे राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपस्थित राहणार, शिवसेना भवनातील बैठकीकडे शिवसैनिकांचं लक्ष

13:32 (IST) 24 Jun 2022
ही आव्हानं द्यायची वेळ नाही, भास्कर जाधव यांचा संजय राऊत यांना टोला

मुंबई : ही आव्हानं द्यायची वेळ नाही, भास्कर जाधव यांचा संजय राऊत यांना टोला. आव्हान द्यायला पाहिजे, पण सध्याची परिस्थिती पाहता हे आव्हान द्यायची नाही, तर संवादाची वेळ आहे. आपले आमदार का नाराज आहेत, ते का सोडून गेले? आपले मंत्री का निघून गेले हे समजून घ्यायला पाहिजे. मी तेव्हाही सांगितलं होतं की आपल्या कोट्यातील मंत्रिपद इतरांना देऊ नका? शिवसेनेने मुख्यमंत्री पद घेतले व आपल्या कोट्यातील तीन मंत्रीपद अपक्ष आमदारांना का दिली? भास्कर जाधव यांचा सवाल?

13:30 (IST) 24 Jun 2022
खासदार विनायक राऊत बैठकीसाठी शिवसेना भवन येथे दाखल

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची महत्वाची बैठक आज शिवसेना भवनात होणार आहे. यासाठी खासदार विनायक राऊत शिवसेना भवनात दाखल झाले आहेत.

13:28 (IST) 24 Jun 2022
सचिन अहिर बैठकीसाठी शिवसेना भवन येथे दाखल

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची महत्वाची बैठक आज शिवसेना भवनात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सचिन अहिर शिवसेना भवनात दाखल झाले आहेत.

13:21 (IST) 24 Jun 2022
उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिल्याने आमदार वैभव नाईक यांचे कुडाळ तालुक्यात जंगी स्वागत

सिंधुदुर्ग : कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहिल्याने आज कुडाळ तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आले. पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत संदेश पारकर, सतीश सावंत उपस्थित होते. कुडाळ शिवसेना शाखेत स्वागत होताच कुडाळ काँग्रेसच्या वतीने देखील त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कुडाळ बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर भव्यदिव्य अशी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

13:12 (IST) 24 Jun 2022
पवारांसोबतच्या बैठकीनंतर राऊतांचं एकनाथ शिंदेंना जाहीर आव्हान

आता वेळ निघून गेली आहे. जर रस्त्यावर लढाऊ झाली तर तिथेही आम्हीच जिंकू अशा शब्दात शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना जाहीर आव्हान दिलं आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तुम्ही या, आमची पूर्ण तयारी आहे असं आव्हान दिलं.

सविस्तर बातमी

13:01 (IST) 24 Jun 2022
पोलीस आयुक्त संजय पांडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर

मुंबई : पोलीस आयुक्त संजय पांडे मातोश्रीवर, मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतर रवाना, माध्यमांशी बोलणं टाळलं

12:50 (IST) 24 Jun 2022
“वेळ निघून गेली, अल्टिमेटम संपला”; संजय राऊतांचा बंडखोरांना सूचक इशारा

मुंबई : संजय राऊत म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन करून सांगतो. आम्ही जिंकणार आहोत. आम्ही हार मानणार नाही. ज्यांना सामना करायचं आहे त्यांनी मुंबईमध्ये यावं. त्यांची वेळ निघून गेली आहे. शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत बैठक झाली. गृहमंत्री यांना न्याय व्यवस्था चांगली माहित आहे. आम्ही सगळे जण संपर्कात आहोत. अल्टिमेटम संपला आहे.”

12:48 (IST) 24 Jun 2022
“साहेब, आम्ही तुमच्यासोबत”; ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुखाकडून फेसबूक पोस्ट करत एकनाथ शिंदेंना पाठिंबा

“साहेब, आम्ही तुमच्यासोबत, आमची साथ हिंदुत्वाच्या धगधगत्या ज्वाळांना”, ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुखाकडून फेसबूक पोस्ट करत एकनाथ शिंदेंना पाठिंबा

12:26 (IST) 24 Jun 2022
भाजपाचं राज्यपालांना पत्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हस्तक्षेप करण्याची मागणी

भाजपाचं राज्यपालांना पत्र, सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता हस्तक्षेप करण्याची मागणी, महाविकासआघाडीवर २ दिवसांपासून अंदाधुंद निर्णय घेत असल्याचा आरोप, ४८ तासात १६० शासन निर्णय घेण्यात आले, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही घाट घातल्याचा आरोप, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून पत्र

12:18 (IST) 24 Jun 2022
शिवसेना बुलढाणा जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत बैठकीसाठी शिवसेना भवन येथे दाखल

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची महत्वाची बैठक आज (२४ जून) दुपारी १२ वाजता शिवसेना भवनात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जालिंदर बुधवत (बुलढाणा जिल्हा प्रमुख) शिवसेना भवनात येथे दाखल झाले आहेत.

12:12 (IST) 24 Jun 2022
कृषिमंत्री भुसे आसाम येथे चिंतन शिबिरात, शेतकरी वाऱ्यावर : संजय राऊत

संजय राऊत म्हणाले, “खरीप हंगामात कृषी मंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. सध्या राज्यात पाऊसकमी आहे, पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यमंत्री आपण कृपया लक्ष द्या.”

12:09 (IST) 24 Jun 2022
शिवसेना आमदार भास्कर जाधव कुठे आहेत?

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ हे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बुधवारी रात्री सोडल्यानंतर तोवर शिवसेनेबरोबर असलेले आणखी पाच आमदार गुरुवारी गुवाहाटीमध्ये जाऊन बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले. कृषीमंत्री दादा भुसे, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दीपक केसरकर, माजी वनमंत्री संजय राठोड हे आणखी पाच आमदार शिंदे गटात गेले. यादरम्यान भास्कर जाधव कुठे आहेत अशी चर्चा रंगली होती. मात्र भास्कर जाधव हे चिपळूणमध्येच असून त्यांनी न्यूज १८ शी बोलताना यासंबंधी माहिती दिली.

सविस्तर बातमी

11:50 (IST) 24 Jun 2022
“काही लोकांचा माज…”; शरद पवारांबद्दल नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यावरुन मोदी-शाहांचा उल्लेख करत राऊत संतापले

महाराष्ट्रामधील केंद्रीय मंत्री शरद पवारांसारख्या व्यक्तीला धमकावत असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष घातलं पाहिजे असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडी विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करेल असा विश्वास व्यक्त करतानाच नारायण राणेंनी शरद पवारांना धमकीवजा इशारा देताना ट्विटरवरुन केलेल्या ‘…तर घर गाठणे कठिण होईल’ वक्तव्यावरुन नाराजी व्यक्त केलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त.

11:44 (IST) 24 Jun 2022
शिवसैनिक कष्ट करतो आणि घरदार सांभाळून शिवसेना पक्ष वाढवतो : दीपाली सय्यद

दीपाली सय्यद म्हणाल्या, “शिवसैनिक कष्ट करतो आणि घरदार सांभाळून शिवसेना पक्ष वाढवतो. त्याला ना सत्तेचा लोभ, ना पैशाचा. तो फक्त शिवसेनेचा पाईक आहे. आदित्य ठाकरे व श्रीकांत शिंदे यांनी ही जबाबदारी घेऊन कोसळणाऱ्या शिवसैनिकांना न्याय द्यावा. जय महाराष्ट्र!”

11:24 (IST) 24 Jun 2022
आदित्य ठाकरे मध्यरात्री मातोश्रीबाहेर; कॅमेरे बंद करण्यास सांगितलं, नेमकं काय झालं?

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राजकीय संकट निर्माण झालं असताना सर्वांच्या नजरा ठाकरे कुटुंबाचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीकडे आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडलं आणि कुटुंबासह मातोश्रीवर परतले. यानंतर मातोश्रीवरील घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष असताना शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे मध्यरात्री निवासस्थानाबाहेर आले होते.

सविस्तर बातमी

11:13 (IST) 24 Jun 2022
महाविकास आघाडीचं सरकार पडतंय यांचं मला अजिबात दुःख नाही – राजू शेट्टी

सांगली : राजू शेट्टी म्हणाले, “महाविकास आघाडीचं सरकार पडतंय याचं मला अजिबात दुःख नाही. कारण आम्ही दोन महिन्यापूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. कारण हे सरकार आता जनताभिमुख राहिलेले नाही हे स्पष्ट होतं. भारतीय जनता पार्टी पाशवी वृत्ती दाखवून सरकार हस्तगत करत आहे.”

“भाजपाकडून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्रामधील महाविकास आघाडीचे सरकार पाडलं जात आहे. हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून घातक आहे. भाजपाकडे ईडी, सी.बी.आय. इनकम टॅक्स हे तीन कार्यकर्ते आहेत आणि यांच्या माध्यमातूनच या सगळ्या उलथा पालथी होतात. हे स्पष्ट आहे,” असा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला.

11:09 (IST) 24 Jun 2022
बंडखोरांना कोणत्या महाशक्तीत विलीन व्हायचंय ते होऊ द्या, पण शिवसेना : संजय राऊत

संजय राऊत म्हणाले, “ही आता कायदेशीर लढाई आहे. पाहुया सर्वोच्च न्यायालयाचे निकाल काय म्हणतात? काहीजण म्हणतात आकडे ४० आहेत, काहीजण म्हणतात १४० आहेत. त्यांनी एक निर्णय घेतलाय, पण महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. शिवसेनेचा आकडा कमी झालाय, पण ते आमदार जेव्हा शिवसेनेत येतील तेव्हा त्यांच्या निष्ठेची खरी कसोटी लागेल. आता काही लोक शरद पवारांना घरी जाऊ देणार नाही अशी धमकी देत आहेत. ही आपली संस्कृती आहे का? मोदी, शाह यांनी ऐकावं तुमचे खासदार काय बोलत आहेत. त्यांना कोणत्या महाशक्तीत विलीन व्हायचंय ते होऊ द्या, पण शिवसेना एक महासागर आहे.”

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं बड

महाराष्ट्रातील राजकीय संकट चौथ्या दिवशीही कायम आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना आमदारांची संख्या वाढतच आहे.