भारतीय लोकशाहीची सर्वात जमेची बाजू अशी की, येथे जनतेने एखाद्याला डोक्यावर घेतले तर तो रातोरात मोठा होऊ शकतो. भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारल्यानंतर असे म्हटले गेले की, यापुढे राणीच्या पोटातून राजा जन्माला येणार नाही तर मतपेटीतून जन्माला येईल. मागच्या ७० हून अधिक वर्षांपासून मतपेटीतून अनेक नेते जन्माला आले, ज्यांनी भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य प्रदेशमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. भाजपाने निवडणुकीत एकहाती विजय मिळविला असला तरी काही विजय हे लोकशाहीची ताकद दाखवून देतात. भारतीय आदिवासी पक्षाचे (Bharat Adivasi Party – BAP) कमलेश्वर डोडियार यांनी काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांचा पराभव करून विजय मिळविला आहे. आदिवासी असलेल्या डोडियार यांचे घर मातीचे आहे. कर्ज काढून त्यांनी निवडणूक लढविली आणि आमदार झाल्यावर भोपाळ येथील विधानभवनात जाण्यासाठी त्यांनी उधारीवर मोटारसायक घेतली आणि ३३० किलोमीटरचा प्रवास केला.

रतलाम जिल्ह्यातील सैलाना विधानसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळविला. सैलाना जिल्ह्यात एकूण पाच मतदारसंघ आहेत. इतर चार मतदारसंघात भाजपाने एकहाती विजय मिळविला आहे. सैलानामध्येही भाजपा आणि काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष विजयाचा दाव करत होते. पण भारत आदिवासी पक्षाच्या डोडियार यांनी सर्वांना धूळ चारत विजय मिळविला. कमलेश्वर डोडियार हे अत्यंत हलाखीच्या परिस्थिती आपले जीवन जगत असून त्यांचे कुटुंबिया मातीच्या घरात राहतात. लोकांनी एखाद्याला पदावर बसविण्याच्या ठरविले तर देशातला कोणताही नागरिक लोकप्रतिनिधी होऊ शकतो, याचे हे आणखी एक उदाहरण आहे.

विना हेल्मेट कारवाई झाल्यानंतर समोर आले सत्य

कमलेश्वर डोडियार यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संघर्ष केला. शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी मजूरी आणि डिलिव्हरी बॉयचे काम केले. त्यांचे कुटुंबिय अजूनही मातीच्या घरात राहतात. पावसाळ्यात त्यांचा संघर्ष आणखी तीव्र होतो. घरात पाणी शिरते, छत गळते. माध्यमात आलेल्या बातमीनुसार डोडियार यांच्याकडे स्वतःचे कोणतेही वाहन नाही. आमदार झाल्यानंतर त्यांना विधानभवनात कागदपत्रे जमा करण्यासाठी जायचे होते. यासाठी त्यांनी आपल्या मेव्हण्याकडून उधारीवर मोटारसायकल घेतली आणि तब्बल ३३० किमींचा प्रवास करून भोपाळ गाठले. यावेळी त्यांच्याकडे हेल्मेट घेण्यासाठीही पैसे नव्हते. विनाहेल्मेट प्रवास का करत आहेत, असे विचारल्यानंतर त्यांनी सत्यपरिस्थिती सांगितली. तसेच पैसे आल्यानंतर सर्वात आधी हेल्मेट घेईल, असेही ते म्हणाले.

बँक खात्यात केवळ दोन हजार

एबीपी लाईव्ह न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, डोडियार यांच्या बँक खात्यात केवळ २००० रुपये असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे असलेली जमिन आणि घराच्या जागेचा हिशेब केल्यास एकूण संपत्ती दहा लाख असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. राजधानी भोपाळमध्ये जाण्यासाठी त्यांनी नातेवाईकाकडून मोटारसायकल उधारीवर आणली. कमलेश्वर ज्या मतदारसंघातून निवडून आले तो आदिवासी बहुल मदारसंघ आहे. मोटारसायकलने भोपाळ येथे पोहोचल्यानंतर त्यांनी मावळते मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन मतदारसंघाच्या विकासाबाबतच्या त्यांच्या कल्पना सांगितल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Newly elected mla travels 330 km on borrowed bike to reach vidhan bhavan in bhopal kvg