Nishikant Dubey Again Criticizes Raj Thackeray over Marathi-Hindi Controversy: महाराष्ट्रात मराठी न बोलणाऱ्या लोकांवरील हिंसाचाराच्या घटनांबद्दल भारतीय जनता पार्टीचे खासदार निशिकांत दुबे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज्यात सुरू असलेल्या भाषेच्या वादात मनसे कार्यकर्त्यांकडून हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, दुबे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना विकिलिक्सची एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये बिहारी विद्यार्थ्यांवर २००७ मध्ये झालेल्या हल्ल्याचा उल्लेख आहे. याचबरोबर दुबे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीचाही उल्लेख करत ठाकरेंवर टीका केली आहे.

२००७ मध्ये महाराष्ट्रात बिहारी विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या घटनेच्या विकिलिक्सच्या नोंदीचा कथित स्क्रीनशॉट दुबे यांनी शेअर केला आहे. निशिकांत दुबे यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, जेव्हा राज ठाकरे यांना जनतेचा पाठिंबा मिळत नाही, तेव्हा ते “गुंडगिरी” करतात.

“ही २००७ मधील विकिलिक्सची नोंद आहे. जेव्हा राज ठाकरे यांना जनतेचा पाठिंबा मिळत नाही, तेव्हा ते गुंडांना पुढे करतात, म्हणजेच गुंडगिरी हा त्यांचा एकमेव हेतू असतो, जो ते आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी पराभवाच्या भीतीने करत आहेत. त्यामुळे मी ठाकरेंच्या गुंडगिरीला विरोध करतो. आता सहनशीलतेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत”, असे दुबे यांनी म्हटले आहे.

या पोस्टमध्ये खासदार निशिकांत दुबे पुढे म्हणाले की, “मराठी समाज आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहे, देश आपल्या सर्वांचा आहे. मी जिथे खासदार आहे, तिथून मराठी मधु लिमये सलग तीन वेळा खासदार होते. इंदिरा गांधी यांच्या विरोधात आम्ही एका मराठी व्यक्तीला लोकसभेत पाठवले होते. ठाकरे, भानावर या. तुमच्या या लढ्याला मराठी लोकांचा लढा बनवू नका. आम्हीही मुंबईच्या विकासात योगदान दिले आहे आणि देत राहू.”

दरम्यान, भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी कालही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मराठीच्या मुद्द्यावरून टीका केली होती. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले होते की, “छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, टिळक, सावरकर, आंबेडकर, महात्मा फुले यांच्या महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय करत आहेत, व्हिडिओ पहा आणि मी काय म्हणतो त्यावर विश्वास ठेवा.”

ते पुढे म्हणाले होते की, “आम्हाला मराठी, गुजराती, तेलगू, कन्नड, तमिळ, बंगाली, मल्याळम, भोजपुरी आणि हिंदीचा अभिमान आहे. महाराष्ट्रातील सर्व स्वातंत्र्यसैनिक आपल्या देशातील स्वातंत्र्यसैनिकांसारखेच आदर्श आहेत. पण ठाकरे बंधूंनो, तुमच्या गुंडगिरीचा काळ संपला आहे.”