पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गुरुवारी (४ एप्रिल) एकाच मंचावर एकत्र आले. मोदी सध्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात गुंतले आहेत. दरम्यान, आज त्यांनी बिहारच्या जमुई येथे एका जनसभेला संबोधित केलं. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारदेखील त्यांच्याबरोबर होते. नितीश कुमार यांनीदेखील या सभेत भाषण केलं. नितीश कुमार यांनी जमुईमधील सभेत केलेल्या भाषणात राष्ट्रीय जनता दलाबरोबरची आघाडी तोडून भाजपाबरोबर युती करण्याच्या निर्णयावर सविस्तर भाष्य केलं. नितीश कुमार म्हणाले, “आम्ही खोटी-खोटी आघाडी केली होती. परंतु, जेव्हा आम्हाला समजलं की, तिकडे गडबड सुरू झाली आहे, त्यानंतर आम्ही लगेच वेगळे झालो.” त्यानंतर नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहून म्हणाले, आता आम्ही कायमचे एक झालो आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीश कुमार पंतप्रधान मोदींकडे पाहून म्हणाले, आम्ही मध्येच खोटं-खोटं त्यांच्याबरोबर (राजद) गेलो होतो. तिकडे गेल्यावर काही महिन्यांनी आमच्या लक्षात आलं की, तिकडे गडबड सुरू झाली आहे. मग आम्ही परतण्याचा निर्णय घेतला आहे. आता आम्ही (संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पार्टी) कायमचे एकत्र आलो आहोत. आता आम्ही इकडे-तिकडे फिरकणार नाही, कुठेही जाणार नाही.

नितीश कुमार यांनी यावेळी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. तसेच केंद्रातल्या मोदी सरकारवर स्तुतीसुमनं उधळली. नितीश कुमार म्हणाले, पंतप्रधान मोदी केंद्रात १० वर्षांपासून आहेत. ते किती कामं करत आहेत. बिहारसाठीदेखील ते खूप कामं करत आहेत. बिहारच्या विकासासाठी कामं करून घेत आहेत. रस्ते, पूल उभारण्यापासून वेगवेगळी विकासकामं चालू आहेत. केंद्र सरकार सर्व गरजेच्या गोष्टी करत आहे.

हे ही वाचा >> “संदेशखाली प्रकरणातील गुन्हेगारांना संपूर्ण आयुष्य…”, पंतप्रधान मोदींचा इशारा; प. बंगालमधील सभेतून TMC वर टीका करत म्हणाले…

बिहारचे मुख्यमंत्री म्हणाले, पूर्वी हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडणं व्हायची. आम्ही सत्तेत आल्यावर ते बंद झालं. मी आज या व्यासपीठावरून मुस्लीम समुदायाला एवढंच सांगेन की, एक गोष्ट विसरू नका, आम्ही सत्तेत आहोत तोवर धर्माच्या नावाखाली भांडणं होणार नाहीत. परंतु, तुम्ही चुकून जरी तुम्ही त्यांना (राजद, काँग्रेस) मत दिलंत तर ते हिंदू आणि मुसलमानांमध्ये भांडणं लावतील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar says we had fake alliance with rjd in front of narendra modi asc