नवी दिल्ली : गेल्या वर्षी हरियाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संगनमताने मतचोरीच नाही, तर ‘सरकार चोरी’ ची व्यवस्था निर्माण केली, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. हरियाणातील एकूण दोन कोटी मतदारांपैकी २५ लाख मतदार बनावट होते, असा दावा गांधी यांनी केला.

विशेष म्हणजे एका ब्राझिलियन मॉडेलच्या नावाचा वापर १० मतदान केंद्रांवर २२ वेळा करण्यात आला, असा आरोप करत बिहार विधानसभा निवडणुकीतही मतचोरीची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला एक दिवस उरला असताना राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत भाजप निवडणूक आयोगाच्या संगनमताने मतचोरी करत असल्याचा आरोप केला. हरियाणा राज्यातील प्रत्येक आठ मतदारांमध्ये एक मतदार बनावट होता, असा आरोप राहुल गांधींनी केला. एकूण २५ लाख म्हणजेच १२ टक्के मतदार बनावट होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर मतचोरी होऊनही काँग्रेसचा आठ मतदारसंघांमध्ये फक्त २२ हजारांनी पराभव झाला, असे सांगत राहुल गांधींनी ही मतचोरी झाली नसती तर हरियाणामध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाले असते असा अप्रत्यक्ष दावा केला. राहुल गांधींचा मतचोरीचा नवा आरोप म्हणजे ‘हायड्रोजन बॉम्ब’ असल्याचा दावा काँग्रेसने केला.

‘‘हरियाणामध्ये काँग्रेस विजयी झाली असती, मात्र विजयाचे पराभवात रूपांतर करण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘ऑपरेशन सरकार चोरी’ सुरू केले,’’ असे राहुल गांधी म्हणाले.

मतदारांमध्ये ब्राझिलियन मॉडेल!

मतदारयादीमध्ये एका ब्राझिलियन मॉडेलचे छायाचित्र आढळले असून वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर तिच्या नावाची नोंद सीमा, स्वीटी आणि सरस्वती अशी झालेली आहे. या नावांचा राय मतदारसंघातील १० मतदानकेंद्रांवर २२ वेळा मतदानासाठी वापर झाला. अन्य एका प्रकरणात, दोन मतदान केंद्रांवर एकाच व्यक्तीचे २२३ वेळा छायाचित्र आढळले. दुसऱ्या प्रकरणात, एका घरात ५०१ नोंदणीकृत मतदार, तर दुसऱ्या घरात १०८ मतदार सापडले. पलवल जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांच्या घर क्रमांक-१५० मध्ये ६६ मतदारांची नोंद आहे. एका घरात ५०१ लोक कसे राहू शकतात, ब्राझिलियन महिला २२ वेळा मतदान कशी करू शकते, अशी उपहासात्मक टिप्पणी राहुल गांधींनी केली. बनावट मतदार अनेक मतदार केंद्रांवर जाऊन अनेक वेळा मतदार करतात. ही चोरी उघड झाली असती म्हणूनच केंद्रीय निवडणूक आयोग मतदानाचे सीसीटीव्ही फुटेज राजकीय पक्षांना उपलब्ध करून देत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींचे आरोप निराधार – निवडणूक आयोग

राहुल गांधी यांचा मतांमध्ये फेरफार करण्याचा आरोप निराधार आहे. हरियाणातील मतदारयादीच्या फेरआढाव्याच्या प्रक्रियेदरम्यान काँग्रेसने एकदाही अधिकृत तक्रार वा आक्षेप नोंदवला नाही, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले. काँग्रेसच्या मतदान केंद्र प्रतिनिधींनी अनेक वेळा मतदान करणाऱ्यांना रोखले का नाही किंवा मतदान केंद्रावरील त्रुटी का दाखवल्या नाहीत, असा सवाल आयोगाने केला.