नवी दिल्ली : देशाच्या दिवाळखोर परराष्ट्र धोरणामुळे पाकिस्तान, चीन यांची युती झाली असून भारताला एकाचवेळी दोन्ही देशांच्या विरोधात लढावे लागत आहे. या युतीला पंतप्रधान, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री घाबरले असावेत अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केली.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भाषणात एकदाही चीनचा उल्लेख केला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात बोलण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये हिंमत नाही. मोदींकडे पाकिस्तानविरोधात लढण्याची राजकीय इच्छाशक्ती नाही इतकेच नव्हे तर सैन्याला युद्ध करण्याचे स्वातंत्र्य देखील दिले नाही. त्यातून केंद्र सरकारमधील राजकीय नेतृत्वाचा कमकुवतपणा स्पष्ट होतो, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर शरसंधान साधले.

लोकसभेत मंगळवारी ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेत राहुल गांधींनी, “मोदींनी लोकसभेच्या भाषणात ट्रम्पना आव्हान द्यावे. तुम्ही मध्यस्थीचे आणि शस्त्रंसंधीचे करत असलेले दावे खोटे आहेत. तुम्ही खोटे बोलत आहात असे मोदींनी ट्रम्पना सांगितले पाहिजे,” असे आव्हान दिले. ट्रम्प २९ वेळा बोलले की, माझ्यामुळे शस्त्रसंधी करण्यात आला. मोदींकडे हिंमत असेल तर सांगावे की ट्र्म्प खोटे बोलत आहेत, असे ते म्हणाले. ‘न्यू नॉर्मल’ हा शब्द प्रचलित झाला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असतानाच मोदींनी विजय घोषित केला. दहशतवादी कृत्य हे युद्धाचे कृत्य ठरेल, असे म्हणणे म्हणजे भारताला युद्धात खेचायचे असेल तर हल्ला करा असे सांगण्याजोगे आहे. पुढचा दहशतवादी हल्ला झाला तर पाकिस्तानवर तुम्ही हल्ला करणार का, असेही राहुल गांधींनी विचारले.

मोदी सरकारमध्ये पाकिस्तानविरोधात लढण्याची राजकीय इच्छाशक्ती नव्हती. त्यांना पाकिस्तानविरोधात युद्ध करायचेच नव्हते, असा दावा राहुल गांधींनी केला. ऑपरेशन सिंदूर मध्यरात्री १.४५ वाजता सुरू झाले, २२ मिनिटे चालू राहिले. १.३५ वाजता आम्ही पाकिस्तानला फोन करून सांगितले की, बिगरलष्करी लक्ष्य अड्डे नष्ट केले. आम्हाला युद्ध करायचे नाही असे सांगितले. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असताना ‘डीजीएमओ’ला केंद्र सरकारने शस्त्रसंधी करायला सांगितले. पाकिस्तानला तुम्ही थेट राजकीय इच्छाशक्ती नसल्याचे दाखवले. तुम्ही शरणागती पत्करली, असा प्रहार राहुल गांधींनी केला. सैन्याला स्वातंत्र्य दिल गेले नाही असे लष्करी अधिकाऱ्यांनीच सांगितले आहे याचेही त्यांनी स्मरण करून दिले.

सिंदूरची कारवाई ही मोदींची प्रतिमा उंचावण्यासाठी करण्यात आली होती. सैन्यदलाचा वापर मोदींनी स्वतःच्या पीआरसाठी केला. सैन्याचा वापर करून मोदींनी राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करू नये. मोदींमध्ये इंदिरा गांधींमध्ये होती त्याच्या ५० टक्के जरी हिंमत असेल तर ट्रम्प यांना ठणकावून सांगावे की, ते खोटारडे आहेत. मोदींनी लोकसभेच्या भाषणात ट्रम्पना आव्हान द्यावे. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते

परराष्ट्रमंत्र्यांवर टीका

परराष्ट्रमंत्री म्हणतात, दहशतवादाची सगळ्या देशांनी निंदा केली. पण, पहलगामनंतर एकाही देशाने पाकिस्तानची निंदा केली नाही, हे त्यांनी सांगितले नाही. जगाने आपल्याला पाकिस्तानच्या बरोबरीला आणले. पहलगाम हल्ल्याचे सूत्राधार लष्करप्रमुख जनरल मुनीर यांना ट्रम्प यांनी भोजनासाठी बोलावले. त्याचा मोदींनी ट्रम्पना जाब विचारला नाही. मुनीर यांनी युद्ध केले नाही म्हणून धन्यवाद देण्यासाठी त्यांना बोलावले, असे ट्रम्पनी सांगितले. जनरल मुनीर वगैरे मंडळी दहशतवाद कसा रोखायचा यावर आता चर्चा करत आहेत. असे असताना भारताचे परराष्ट्रमंत्री कुठल्या ग्रहावर बसले आहेत, असा सवाल राहुल गांधींनी केला.