बिहारमधील मतदार यादीमध्ये गया जिल्ह्यात निवडणूक आयोगाने एक संपूर्ण गाव एकाच घरात राहताना दाखवल्याची टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. बिहारमध्ये राहुल गांधी यांची ‘मतदार अधिकार यात्रा’ सुरू आहे. त्यांनी ‘एक्स’वर एक संदेश प्रसिद्ध करत ‘निवडणूक आयोगाची जादू पाहा, एका घरात संपूर्ण गाव वसले आहे’, अशी टिप्पणी केली.

काँग्रेसने ‘एक्स’वरील संदेशात म्हटले की, बाराचट्टी विधानसभा मतदारसंघातील गया जिल्ह्यातील निदानी गावात, एका बूथवरील सर्व ९४७ मतदारांचे घर क्रमांक सहा दाखवण्यात आले आहे. हे फक्त एकाच गावाबद्दल आहे. संपूर्ण देशात किती अनियमितता असेल, याची आपण फक्त कल्पना करू शकतो.’

दरम्यान, ‘ज्या गावांमध्ये किंवा झोपडपट्टी गटांत घरांचे अनुक्रमांक नसतात तिथे काल्पनिक घर क्रमांक दिले जातात. मतदार नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे केले जाते’, असे स्पष्टीकरण बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिले आहे. आयोगाने गावातील रहिवाशांच्या कथित चित्रफितीही प्रसृत केल्या असून, ज्यामध्ये लोक मतदार यादीच्या विशेष सखोल फेरतपासणीवर (एसआयआर) समाधानी असल्याचे सांगण्यात येत आहे.