भाजपचे ज्येष्ठ नेते विजय कुमार मल्होत्रा यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. दिल्लीमध्ये भाजपचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या नेत्यांमध्ये मल्होत्रा यांचा समावेश होत असे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांच्यावर दिल्लीच्या ‘एम्स’ रुग्णालयात उपचार सुरू होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह विविध नेत्यांनी मल्होत्रा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यावर बुधवारी लोधी मार्ग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. त्यापूर्वी दुपारी १२ ते २ या वेळेत पंडित पंत मार्ग येथील भाजपच्या सध्याच्या कार्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.
दिल्लीत एकेकाळी पक्षाचा प्रमुख चेहरा असलेले व्ही. के. मल्होत्रा दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. ते दिल्लीमधून पाच वेळा खासदार म्हणून आणि दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. २००८मध्ये भाजपने त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केले होते. मात्र, काँग्रेस पुन्हा विजयी झाली होऊन शीला दीक्षित यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहिले होते.
विजय कुमार मल्होत्रा यांनी उत्कृष्ट नेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यांना जनतेच्या समस्यांची उत्तम जाण होती. आमचा पक्ष दिल्लीत मजबूत करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान