Tejashwi Yadav on vice president jagdeep dhankhar resignation : बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. यादरम्यान बिहारमधील विरोधी पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी जगदीप धनखड यांनी अचानक दिलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. धनखड यांनी राजीनामा दिला की तो घेतला गेला याबद्दल संशय व्यक्त केला आहे.
तेजस्वी यादव म्हणाले की, “आश्चर्याची बाब आहे, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तर त्यांन व्यवस्थित कामकाज चालवले होते. अचानक कळलं की त्यांनी राजीनामा दिला आहे. आता देण्यात आला की घेतला गेला हा प्रश्न उपस्थित होतो. अचानक प्रकृती खालवली असेल तर त्याच वेळी राजीनामा देण्याची चर्चा होऊ शकत नाही. आरोग्य ठीक नव्हते तर अधिवेशन सुरू होण्याच्या आधी देखील ते राजीनामा देऊ शकत होते. अशी चर्चा आहे की राजीनामा घेतला गेला आहे. आता याचे कारण काय आहे आणि काय नाही हे तर तेच सांगू शकतात.”
नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती बनवले जाऊ शकते, अशा चर्चा होत आहेत. याबद्दल विचारले असता तेजस्वी यादव म्हणाले की, “मुख्यमंत्री हे अचेत अवस्थेत आहेत. त्यांच्या आरोग्याबद्दल बातम्या येत आहेत. धनखड राजीनामा देऊ शकतात तर लोक हा प्रश्न उपस्थित करत आहेत की, भाजपाची कोणती अडचण आहे की नितीश कुमार यांना देखील पुढील मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून फक्त निवडणुकीपर्यंतच बनवले आहे. मला असे वाटते की धनखड यांच्याबरोबर जे झालं, बिहारच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबरोबर देखील तेच काम होईल. जे महाराष्ट्रात शिंदेंबरोबर झालं तेच काम नितीश कुमार यांच्याबरोबर होईल. कारण अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे की निवडणुकीपर्यंतच त्यांचे नेतृत्व असेल त्यानंतर त्यानंतर वेळच सांगेल की बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल.”
जगदीप धनखड यांनी सोमवारी (२१ जुलै) उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे पदाचा राजीनामा सादर केला आहे. सोमवारी उशिरा रात्री आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे मुदतीपूर्वीच हे पद रिक्त झाले आहे.