कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला धोबीपछाड दिला असून संपूर्ण बहुमताने विजय संपादन केला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागा जिंकल्या असून भाजपाला केवळ ६५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. एका जागेचा निकाल अद्याप बाकी असून येथे काँग्रेसने आघाडी घेतली आहे. कर्नाटकातील पराभवामुळे दक्षिण भारतातील एकमेव राज्य भाजपाच्या हातून निसटलं आहे. दक्षिण भारतातील एकाही राज्यात आता भाजपाची सत्ता उरली नाही.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानं भाजपाची दक्षिण भारतात पुरती नाकाबंदी केली आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

हेही वाचा- काँग्रेस की भाजपा? कर्नाटक निवडणुकीच्या इतिहासात कोणत्या पक्षाने जिंकल्या सर्वाधिक जागा? जाणून घ्या

अजित पवार ट्विटमध्ये म्हणाले, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा कर्नाटक आणि देशाच्या राजकारणाची वाटचाल पुन्हा एकदा विकास आणि लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं सुरू झाल्याची नांदी आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानं भाजपाची दक्षिणेकडील पुरती नाकाबंदी केली आहे.”

“राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मित्रपक्षांची महाविकास आघाडी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती करेल. महाराष्ट्रातील जनतेनं तसा निर्धार आधीच केला आहे. कर्नाटकातील मतदार, काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!” असंही अजित पवार म्हणाले.