Arvind Kejriwal On Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा आज (८ फेब्रुवारी) निकाल समोर आला आहे. दुपारपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतीय जनता पक्ष ४७ जगांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष २२ जागांवर आघाडीवर आहे. दिल्लीच्या निकालाचं चित्र पुढच्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. मात्र, आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार दिल्लीत भाजपाचं सरकार स्थापन होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एवढंच नाही तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया या दोन मोठ्या नेत्यांचाही पराभव झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी पराभव केला आहे. खरं तर अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदीया हे आम आदमी पक्षाचे दिग्गज नेते मानले जातात. मात्र, त्यांचाच या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे हा आपच्या कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का मनला जात आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्यानंतर आणि आम आदमी पक्षाला आलेल्या अपयशानंतर पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली. ‘दिल्लीच्या जनतेने दिलेला कौल मान्य, विजयासाठी भाजपाला शुभेच्छा, आम्ही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू’, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

“दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर आला आहे. या निकालात दिल्लीच्या जनतेने जो कौल दिला आहे तो आम्ही अत्यंत नम्रपणे स्वीकारतो. तसेच विजयासाठी मी भारतीय जनता पक्षाचं अभिनंदन करतो. मला आशा आहे की लोकांनी त्यांना ज्या आश्वासनांसाठी मतदान केले आहे ते सर्व आश्वासने भाजपा पूर्ण करतील. आम्ही आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा या क्षेत्रात खूप काम केलं. आता आम्ही फक्त विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही, तर आम्ही लोकांमध्ये राहून लोकांची सेवा करत राहू. लोकांच्या सुखात आणि दु:खात आम्ही त्यांच्या बरोबर राहू. कारण आम्ही राजकारणात फक्त सत्तेसाठी आलेलो नाहीत”, अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

मनिष सिसोदिया यांचाही पराभव

आम आदमी पक्षाचे मनिष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, मनिष सिसोदिया यांचाही पराभव झाला आहे. तरविंदर सिंग मारवाह या ठिकाणाहून विजयी झाले आहेत. याआधी दोन निवडणुका मनिष सिसोदिया जिंकले होते. त्यांनी पटपडगंजमधून निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र सिसोदियांचा पराभव झाला आहे. त्यांना हरवणारे मारवा २०२२ भाजपात आले होते. त्याआधी ते काँग्रेसमध्ये होते तसंच माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात होते. मारवा हे भाजपाच्या शिख नेत्यांपैकी एक महत्त्वाचे नेते आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal on delhi election result 2025 aam aadmi party defeat and bjp vs congress and aap delhi politics gkt