Awadh Ojha PATPARGANJ Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळजवळ निश्चित झाले असून, तब्बल २६ वर्षांनी पुन्हा एकदा दिल्लीत भाजपाचे सरकार स्थापन होणार आहे. दरम्यान दिल्ली निवडणुकीत प्रसिद्ध युट्यूबर आणि यूपीएससी कोचिंग संस्था चालवणारे शिक्षक अवध ओझा यांचा पटपडगंजमधून पराभव झाला आहे. यानंतर पटपडगंज मतदारसंघातील पराभवाबाबत अवध ओझा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अवध ओझा यांनी याला त्यांचा वैयक्तिक पराभव म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले अवध ओझा?

दिल्लीच्या पटपडगंज विधानसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार अवध ओझा यांनी पराभवानंतर त्यांच्या भावना व्यक्त करत म्हटले की, “मी जनतेचे आभार मानतो… मी दुसऱ्या क्रमांकावर आलो, पुढच्या वेळी मी
अव्वल येण्याचा प्रयत्न करेन. चूक अशी होती की मी सर्वांना भेटू शकलो नाही, कदाचित मला यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही पण तरीही मी या पराभवाची वैयक्तिक जबाबदारी घेतो.”

२५ हजार मतांनी पराभव

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा सरकार स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहे. प्रसिद्ध युट्यूबर आणि यूपीएससी शिक्षक अवध ओझा हे देखील या निवडणुकीत आपले नशीब आजमावत होते. पण, अवध ओझा यांना त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. अवध ओझा यांचा पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून २५ हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला. असे असले तरी, अवध ओझा दुसऱ्या स्थानावर राहिले. अवध ओझा यांचा भारतीय जनता पक्षाच्या रविंदर सिंग नेगी यांनी पराभव केला. पटपडगंज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अनिल कुमार तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.

कोण आहेत अवध ओझा?

अवध ओझा हे एक प्रसिद्ध यूपीएससी शिक्षक आहेत. त्यांच्या दिल्लीसह देशातील अनेक शहरांमधील कोचिंग संस्था आहेत. यासोबतच, यूपीएससीसाठी ऑनलाइन कोचिंग देणाऱ्या मोठ्या नावांमध्ये त्यांची गणना होते. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, अवध ओझा काँग्रेस आणि भाजपाकडून तिकीट मागत होते पण त्यांना संधी मिळाली नव्हती. नंतर ते आम आदमी पक्षात सहभागी झाले आणि आपने त्यांना पटपडगंज मतदारसंघातून तिकीट दिले होते. मात्र, यामध्ये त्यांना अपयश आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Awadh ojha lost delhi election 2025 aam