Chandrababu Naidu NDA Meeting: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला बहुमत मिळालं असलं, तरी अपेक्षित जागा मात्र मिळू शकल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर एकीकडे एनडीएमध्ये सत्तास्थापनेसाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं असताना दुसरीकडे इंडिया आघाडीकडूनही सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यात वर्तवली जात आहे. त्यासाठी एनडीएमधील नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांना विरोधकांच्या आघाडीत आणण्याचे प्रयत्न चालू असल्याचचं बोललं जात आहे. याबाबत वेगवेगळे दावे केले जात असतानाच तेलुगु देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या एका विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमका निकाल काय लागला?

भाजपाकडून यंदा अब की बार, ४०० पारची घोषणा देण्यात आली होती. पण संपू्ण एनडीएला मिळून अवघ्या २९३ जागांवर विजय मिळाला. त्यात भारतीय जनता पक्षाला फक्त २४० जागा मिळाल्या. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपाला एनडीएतील मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्याचवेळी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीलाही २३२ जागा मिळाल्यामुळे त्यांना सत्तास्थापनेसाठी ४१ जागांची आवश्यकता आहे. सध्या एनडीएमध्ये असणारे नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्यासारखे प्रमुख घटकपक्ष आधी विरोधकांसोबतच होते. त्यामुळे त्यांना पुन्हा इंडिया आघाडीत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

Video: चिराग पासवान सर्व खासदारांसह नितीश कुमारांच्या भेटीला; बिहारमध्ये घडामोडींना वेग, ‘इंडिया’त सत्तास्थापनेच्या हालचाली?

चंद्राबाबूंचं सूचक विधान!

शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी चंद्राबाबू नायडूंशी संपर्क साधल्याच्या चर्चा चालू आहेत. त्यासंदर्भात एका पत्रकार परिषदेत बोलताना चंद्राबाबू नायडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यम प्रतिनिधींनी चंद्राबाबू नायडूंना पुढील राजकीय धोरणाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, “तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्हाला नेहमीच बातम्या हव्या असतात. मी या देशात अनेक राजकीय बदल पाहिले आहेत. आम्ही एनडीएसोबत आहोत. मी एनडीएच्या बैठकीला जात आहे. यादरम्यानच्या काळात जर काही असेल तर आम्ही तुम्हाला कळवू”, असं चंद्राबाबू नायडू म्हणाले आहेत.

एकीकडे चंद्राबाबू नायडूंनी आपण एनडीएसोबत आहोत व एनडीएच्या बैठकीसाठी जात आहोत असं सांगतानाच दुसरीकडे देशात राजकीय बदल पाहिल्याचंही नमूद केलं आहे. तसेच, काही असेल तर कळवू, असंही त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे. त्यामुळे नेमकं चंद्राबाबू नायडूंचं काय ठरलंय? याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ किंवा ९ जून रोजी शपथ घेणार?

नितीश कुमार-चिराग पासवान भेट!

दरम्यान, बिहारमध्येही राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. चिराग पासवान यांनी आपल्या पाच खासदारांसह मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. नितीश कुमार यांनी मंगळवारी निकालाच्या दिवशी त्यांचे उपमुख्यमंत्री व भाजपाचे नेते सम्राट चौधरी यांना भेट नाकारली होती. त्यामुळे त्यांना भेट नाकारणारे नितीश कुमार चिराग पासवान यांना भेटल्यामुळे ते पुन्हा पलटी मारणार का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrababu naidu clears association with nda narendra modi hints political changes pmw