वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या आक्रमक आणि रोखठोक वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. आता त्यांनी मोदींवर टीका करतानाच मुख्यमंत्री एकनात शिंदेंबाबत खळबळजनक दावा केला आहे. एकनाथ शिंदेंचं काम आता संपलं आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी हिंगोली या ठिकाणी डॉ. बी. डी. चव्हाण यांची प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
“नरेंद्र मोदी २०२४ ला पुन्हा सत्तेत आले तर आता निवडणूक होणार नाही. देशाचा चेहरामोहरा पूर्ण बदलून जाईल. जो ऐकणार नाही त्याला तुरुंगात डांबतील. मोदी सत्तेत आल्यास सीएए आणि एनआरसी लागू करतील. बाबासाहेब आंबेडकर आले तरीही संविधान बदलू शकणार नाहीत अशी ग्वाही दिली जाते आहे. मात्र मोदी सत्तेत आल्यास ते घटना बदलल्याशिवाय राहणार नाही. हे बदलायचं असेल तर मोदींच्या विरोधात मतदान करा” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे पुढच्या दोन महिन्यांत दिसणार नाहीत
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काम संपलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी तुम्हाला एकनाथ शिंदे दिसणारही नाहीत. एकनाथ शिंदेंचा म्हणावा तसा फायदा लोकसभेला दिसला नाही तर वेगळं चित्र दिसू शकतं” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
१७ लाख लाख कुटुंबांनी देश सोडला आहे
प्रकाश आंबेडकर त्यांच्या भाषणात म्हणाले की १७ लाख कुटुंबांनी देश सोडला आहे. हे लोक मुस्लिम किंवा ख्रिश्चन नाहीत तर हिंदू आहेत. त्यांची मालमत्ता ५० कोटी आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विचारतो आहे तुम्ही कोणत्या तोंडाने मोदींना मतं द्यायला सांगत आहात तुम्हाला लाज कशी वाटत नाही? असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.