Assembly Election 2024 Congress party will not be participating in exit polls discussion : विधानसभा निवडणुकीच्या जोरदार प्रचारानंतर आज (२० नोव्हेंबर) रोजी महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यात मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. झारखंडमध्ये आज दुसर्‍या टप्प्यातील मतदान होत असून महाराष्ट्रातील सर्वच २८८ जागांवर एकाच टप्प्यात मतदान घेण्यात आले. मतदानानंतर एक्झिट पोल्सचे कल काय सांगतात? हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. कुणाचे सरकार येणार? याचा अंदाज एक्झिट पोल्सच्या कलातून बांधला जात असतो. निकाल लागेपर्यंत एक्झिट पोल्सवर जोरदार चर्चा झडत असते. मात्र मागच्या काही निवडणुकांत एक्झिट पोल्सचे अंदाज सपशेल चुकीचे ठरलेले दिसले. त्यामुळे आता एक्झिट पोल्सच्या चर्चेत पक्षाचे नेते सहभागी होणार नाहीत, असा निर्णय काँग्रेस पक्षाने जाहीर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (१८ नोव्हेंबर) रोजी प्रचार संपला होता. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा थेट सामना पाहायला मिळत आहे. याबरोबरच मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि तिसरी आघाडी असे इतर काही लहान पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांनी राज्यात निवडणुकीचा जोरदार प्रचार केला. काँग्रेस आणि भाजपाचे केंद्रातील नेते देखील प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले होते. याबरोबरच राज्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखील झडल्याचे पाहायला मिळाले.

काँग्रेसचा मोठा निर्णय

दरम्यान आता मतदान कालावधी संपल्यानंतर आता सर्वांना निवडणूक निकालाची उत्सुकता लागली आहे. यादरम्यान मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर काही तासांतच वृत्तवाहिन्यांकडून त्यांचे निवडणूक निकाल अंदाज (एक्झिट पोल) जाहीर केले जातात. मात्र यापूर्वी काँग्रेस पक्षाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज (२० नोव्हेंबर) निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रसारित होणार्‍या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस पक्ष सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने काँग्रेसच्या सूत्रांच्या हवाल्याने यासंबंधी माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी हरियाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आलेले एक्झिट पोलचे अंदाज काँग्रेससाठी घोर निराशादायक ठरले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एक्झिट पोलच्या चर्चांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा>> Maharashtra Assembly Election Voting Time : राज्यात किती वाजेपर्यंत करता येणार मतदान? वेळ निघून जाण्याआधी लगेच मतदान केंद्रावर जा!

दुपारी तीनपर्यंत किती मतदान?

महाराष्ट्र आणि झारखंड येथील मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. ज्यानुसार झारखंडपेक्षा महाराष्ट्रात मतदानाची गती कमी असल्याचे दिसून आले. दुपारी तीन वाजेपर्यत झारखंड विधानसभा निवडणुकीत अंदाजे ६१.४७ टक्के मतदान झाले. तर महाराष्ट्रात दुपारी तीनपर्यंत अंदाजे ४५.५३ टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रात संध्याकाळी सहापर्यंत मतदान सुरू असणार आहे.

एक्झिट पोल कधी येणार?

आज (२० नोव्हेंबर) रोजी मतदान पार पडल्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया ही २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. पण यापूर्वी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक निकालाचे अंदाज (Exit Poll) जाहीर केले जातील. मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासाने हे निवडणूक निकालाचे अंदाज म्हणजे एक्झिट पोल जाहीर होऊ लागतील. आज (बुधवार) संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी एक्झिट पोल जाहीर होण्यास सुरूवात होईल.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress party will not be participating in exit polls to be telecast today vidhan sabha nivdnuk 2024 rak