शरद पवार यांची महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेली पकड आजही कायम आहे. शरद पवार यांचा पक्ष मात्र फुटला आहे. ज्या ताकदीने त्यांनी हा पक्ष स्थापन करुन एक वेगळा करीश्मा दाखवला होता तशी बाब आत्ताच्या घडीला राहिलेली नाही. याचं कारण आहेत अजित पवार. अजित पवार यांनीच त्यांच्या काकांना म्हणजेच शरद पवारांना आव्हान दिलं आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होईल अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य आणि त्यानंतर शरद पवारांनी केलेलं वक्तव्य. या सगळ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी काय म्हटलं होतं?

लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यातले दोन पक्ष लोप पावतील असं सूचक वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना उद्देशून होतं का? हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. मात्र त्यांचा अंगुलीनिर्देश याच दोन पक्षांकडे होता. या पाठोपाठ शरद पवार यांनीही एक वक्तव्य केलं.

शरद पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चा सुरु

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले “लोकसभा निवडणूक निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष एकवटतील तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. अनेक प्रादेशिक पक्ष येत्या दोन वर्षांत काँग्रेसशी जवळीक साधू शकतात. काँग्रेस आणि आमच्या विचारधारेत फारसा फरक नाही. ” असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. त्यामुळे राजयकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलं असता त्यांनी शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये कधी विलीन होईल ती वेळच सांगितली आहे.

हे पण वाचा- काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार का? शरद पवार म्हणाले…

देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या पक्षाबाबत काय म्हणाले?

“शरद पवारांचा जो काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो काँग्रेसमध्ये विलीन होईल असं त्यांना म्हणायचं असेल. त्यात काही नवल नाही. यापूर्वीही शरद पवारांनी अनेकवेळा पक्ष तयार केला आणि काँग्रेसमध्ये ते गेले. त्यामुळे आता त्यांनी संकेत दिले आहेत की आता त्यांचा पक्ष चालवणं त्यांना कदाचित शक्य होणार नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार त्यांचा पक्ष विलीन करतील” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपा आणि महायुतीला प्रचंड अनुकूल वातावरण आहे. आठही जागा आम्ही जिंकणार आहोत. नंदुरबारमध्ये प्रचंड बहुमताने जिंकतील. धुळ्यातही आमचे डॉ. भामरे विजयी होतील.” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.