लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या प्रचारादरम्यान वेगवेगळे नेते एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहेत. नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. यादरम्यान काही नेते पातळी सोडून टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही नेत्यांकडून शिवराळ भाषेचा वापर होत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील अलीकडच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. तसेच काही सभांमध्ये ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ‘टरबूज’ असा उल्लेख केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवारी) उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले, मी त्यांच्यापेक्षा खाली जाऊन टीका करू शकतो. मात्र ती भाषा मला शोभत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (२९ एप्रिल) सभा घेतली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच नकली शिवसेना या मोदींनी केलेल्या टीकेचाही खास शैलीत समाचार घेतला. या सभेत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘टरबूज’ असा केला.

उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या अशा प्रकारच्या वक्तव्यांमधून यांची निराशा दिसतेय. त्यांच्याकडे लोकांशी बोलायला मुद्दे नाहीत, त्यामुळे ते अशा प्रकारची वक्तव्ये करत सुटलेत. मी तर नागपुरी आहे, मला त्यांच्यापेक्षा खाली जाऊन बोलता येतं. मात्र मला ते शोभत नाही. प्रगल्भ नेत्यांनी असं बोलायचं नसतं. मला वाटतं की उद्धव ठाकरे यांना त्यांचा पराभव दिसतोय त्यामुळेच त्यांची निराशा वाढली आहे. या निराशेतून त्यांची शिवराळ भाषा सुरू झाली आहे. परंतु, त्यांनी अशी कितीही शिवराळ भाषा वापरली तरी जनता त्यांना मतदान करणार नाही, त्यांच्याकडे जाणार नाही.

हे ही वाचा >> पतंजलीच्या फसव्या जाहिरातींप्रकरणी रामदेव यांच्या वकीलांवर न्यायमूर्तींचा संताप; म्हणाले, “आम्ही आता हात वर केलेत”

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

सोलापूरच्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले होते, “तुम्ही कोणाबद्दल बोललात? टरबूज? म्हणजे कोण? मी ज्यांना मागे फडतूस म्हणालो होतो ते का? आता मी बोलत नाही. मी फडतूस म्हटलं होतं, पण आता तसं म्हणत नाही. मी त्यांना कलंक बोललो होतो पण आता बोलत नाही. कारण त्यांना फार वाईट वाटतं. त्यांनीच परवा रायगडमध्ये एक विनोद केला. ते जनतेला म्हणाले, मोदींची बाकीची कामं सोडून द्या, म्हणजेच मोदींनी कामं केली नाही हे त्यांनी मान्य केलं. ते म्हणाले निदान मोदींनी आपल्याला करोना काळात लस दिली होती म्हणून आपण जिवंत राहिलो. त्यासाठी तरी भाजपाला मतदान करता. मुळात लस बनवायला काही संशोधक आहेत ते काय गवत उपटत होते का? मोदींनी लस बनवली असेल तर ते काय करत होते? लस पुण्यात तयार झाली आहे. मोदींनी लस हवेत सोडली नाही.”

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis on uddhav thackeray tarbuj remark i am nagpuri can use bad language asc
Show comments