लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी हे वरचेवर महाराष्ट्रात दौरे करत आहेत. तसेच जाहीर सभांमधून विरोधकांवर टीका करत आहेत. काल (१५ मे) मोदींनी नाशिक येथे घेतलेल्या सभेत काँग्रेस, उबाठा गट आणि शरद पवारांवर टीका केली. शरद पवार देशाचे कृषीमंत्री असताना दहा वर्षात त्यांनी काय केले? असा सवाल मोदींनी उपस्थित करत टीका केली. तसेच काँग्रेस मुस्लीम धार्जिणे असल्याचा उल्लेख त्यांनी पुन्हा एकदा केला. पंतप्रधान मोदींच्या या भाषणावर आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदींवर आरोप केले.
बारामतीच्या मतदानानंतर अजित पवार प्रचाराला अनुपस्थित; शरद पवार काळजी व्यक्त करत म्हणाले, “ते…”
अर्थसंकल्पाचे विभाजन करून १५ टक्के अर्थसंकल्प मुस्लीम समाजासाठी राखीव ठेवायचा, असा काँग्रेसचा डाव असल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी केला होता. या प्रश्नावर बोलत असताना शरद पवार म्हणाले, “मोदींचं हे विधान मुर्खपणाचं आहे. संसेदत मांडला जाणारा अर्थसंकल्प हा देशाचा असतो. अर्थसंकल्प कधीही एका जातीधर्माचा असू शकत नाही. पंतप्रधान मोदी यांच्याकडे प्रचारात सांगण्यासारखे दुसरे काहीही नसल्यामुळे ते लक्ष वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदी सध्या जे बोलत आहेत, त्यातले एक टक्काही सत्य नाही. देश चालविताना जाती-धर्माचा विचार करून चालत नाही.”
‘व्होट जिहाद’ या आरोपावरही शरद पवार यांनी टीका केली. पंतप्रधान मोदींचा आत्मविश्वास ढळलेला आहे, त्यामुळे ते जात आणि धर्मावर बोलत आहेत, असे शरद पवार म्हणाले.
नरेंद्र मोदींना तेव्हा मी इस्रायलला नेलं
मी कृषीमंत्री असताना काय केले, असे पंतप्रधान मोदी विचारत आहेत. पण मी कृषीमंत्री असताना पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांचा राज्यातील शेतीचा कोणताही प्रश्न असला तर ते माझ्याकडे यायचे. मला घेऊन गुजरातला जायचे. एकदा तर मी इस्रायलला जात होतो. तेव्हा मोदींचा मला फोन आला होता. त्यावेळी अमेरिकेने त्यांचा व्हिसा नाकारला होता. त्यामुळे त्यांनी माझ्याबरोबर त्यांना इस्रायलला घेऊन जाण्याची विनंती केली. मी माझ्याबरोबर त्यांना इस्रायलला घेऊन गेलो. इस्रायलमध्ये मी मोदींना चार दिवस फिरवलं, शेतीचं नवं तंत्रज्ञान त्यांना दाखवलं. त्यावेळी मोदींना राज्याच्या विकासात मनापासून रस होता. पण हल्ली त्यांना फक्त राजकारणात रस आहे, असा आरोप शरद पवार यांनी यावेळी केला.
कांद्याच्या प्रश्नावर कुणीतरी बोलणारच ना?
पंतप्रधान मोदींच्या नाशिकच्या सभेत काही तरूणांनी कांद्यावर बोला, अशा घोषणा दिल्या होत्या. हे तरूण शरद पवार गटाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, नाशिकच नाही तर धुळे, पुणे, सातारा अशा जिल्ह्यांमध्ये कांद्याचा प्रश्न उग्र बनला आहे. या भागातील शेतकरी अस्वस्थ आहे. पंतप्रधान मोदी या जिल्ह्यांमध्ये येऊन जर महत्त्वाच्या प्रश्नांना हात घालत नसतील तर साहजिकच कुणीतरी प्रश्न विचारणारच. नाशिकमध्ये हे पहिल्यांदा घडलेले नाही. याआधी तर लोकांनी कांदे फेकलेले आहेत.
नाशिकमध्ये कांदा भाजपाचा वांदा करणार का? असाही प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, लोक काय करतील हे सांगता येत नाही. पण जनमत त्यांच्याविरोधात आहे. मी महाराष्ट्रात जिथे जिथे जातो, तिथे मला हीच परिस्थिती दिसत आहे.