महेश सरलष्कर, लोकसत्ता
नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना लोकसभेतून बडतर्फ करण्याचे ‘रामायण’ ज्या कोलारमधील सभेमुळे घडले, तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जंगी जाहीर सभा घेऊन कर्नाटकमधील अखेरच्या टप्प्यातील प्रचाराची दिशा निश्चित केली. कर्नाटकमधील भाजपचे सरकार हे ४० टक्के कमिशनवाले सरकार असल्याच्या काँग्रेसच्या टीकेला भाजपला अजूनही तगडे प्रत्युत्तर देता आलेले नाही. भाजपच्या स्थानिक नेत्यांना वा मंत्र्यांना हा आरोप खोडून काढणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मोदींनी काँग्रेसच्या काळातील भ्रष्टाचार आणि घोटाळय़ांवर बोट ठेवून प्रदेश भाजपमधील नेत्यांना प्रचारासाठी थोडे बळ मिळवून दिले आहे.
काँग्रेसची सरकारे ८५ टक्के कमिशनवाली सरकारे होती, कर्नाटकमध्ये पुन्हा काँग्रेस सत्तेवर आला तर, राज्य भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकून पडेल असे मोदींचे म्हणणे होते. ८५ टक्क्यांचा संदर्भ देताना मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या विधानाचा आधार घेतला. केंद्र सरकार एक रुपया खर्च करते, त्यातील फक्त १५ पैसे लोकांपर्यंत पोहोचतात. म्हणजेच ८५ टक्के कमिशनमध्ये गायब होतात, विकास १५ पैशांचाच होतो! मोदींनी ४० टक्के कमिशनच्या भाजपच्या भ्रष्टाचाराची तीव्रता कमी करत काँग्रेसच्या ८५ टक्के भ्रष्टाचाराची भीती मतदारांना दाखवली आहे. मोदींनी भाषणामध्ये विकासावर सर्वाधिक भर दिला. मोदींचे म्हणणे होते की, केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून विकासाला गती मिळाली असून प्रकल्पांमध्ये वा योजनांमध्ये भ्रष्टाचार होत नाही. त्यामुळे पूर्ण १०० पैसे लोकांपर्यंत पोहोचतात. काँग्रेसने राबवलेल्या योजनांमध्ये वा प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार झालेला लोकांनी पाहिलेला आहे. विनाभ्रष्टाचार विकास साधायचा असेल तर केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपचे सरकार सत्तेवर असले पाहिजे! मोदींनी अप्रत्यक्षपणे कर्नाटकमध्ये भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची ग्वाही दिली. विद्यमान बसवराज बोम्मई सरकारमध्ये भ्रष्टाचार होत असेल पण, संधी मिळाली तर ही चूक दुरुस्त केली जाईल, असे मोदींनी सूचित केले.
देशाचा वेगाने विकास होत असताना कर्नाटकने मागे राहू नये. जिथे डबल इंजिन सरकार असते, त्या राज्याच्या विकासाला गती मिळते, केंद्राचे साह्य मिळते. पण, जिथे डबल इंजिन सरकार नाही, तिथे विकास गतीने होईल याची शाश्वती देता येत नाही, असा गर्भित इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वेगवेगळय़ा भाषणांतून दिला आहे. मोदींनी हाच मुद्दा सौम्य शब्दांमध्ये आणि मतदारांना भावनिक आवाहन करत मांडला. कर्नाटकची निवडणूक म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी लिटमस टेस्ट नाही. पुढील २५ वर्षांमध्ये कर्नाटकच्या विकासाची दिशा निश्चित करणारी ही निवडणूक असल्याचे मोदी म्हणाले. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आली तर भाजपच्या सरकारपेक्षा अधिक भ्रष्टाचार होईल. शिवाय, डबल इंजिन नसल्यामुळे राज्यांना केंद्राकडून साह्यही मिळणार नाही. मग, कर्नाटकचा विकास कसा होणार? विकास हवा की भ्रष्टाचार हे मतदारांनी ठरवावे, असे आवाहन मोदींनी दोन दिवसांमधील प्रचारसभांमधून केले आहे. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विषारी सापाच्या टिप्पणीला मोदींनी प्रत्युत्तर देणे अपेक्षित होते. कोलारमधील प्रचारसभेत मोदी म्हणाले की, देशाची जनता ही शिवाचे रूप आहे. शिवाच्या गळय़ातील साप बनवण्यास मी तयार आहे! मोदींनी खरगेंना संयत उत्तर देऊन हा मुद्दा प्रभावहीन बनवून टाकला आहे.