Vishal Patil Sangli Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणुकीत आणखी एक लढत चर्चेत राहिली ती म्हणजे सांगलीची. सांगलीत यंदा तिरंगी लढत होती. संजयकाका पाटील (महायुती), चंद्रहार पाटील (महाविकास आघाडी) आणि विशाल पाटील (अपक्ष) अशी तिरंगी लढत झाली. आता निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सांगलीत पाटीलकी कुणाची? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
सांगलीत ६१ टक्के मतदान
सांगलीत लोकसभा निवडणुकीत ६१ टक्के मतदान झालं. चंद्रहार पाटील यांना उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवारी जाहीर केली. ज्यामुळे महाविकास आघाडीतला काँग्रेस हा पक्ष प्रचंड नाराज झाला होता. उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी चंद्रहार पाटील यांना मदत न करता विशाल पाटील यांना मदत केल्याची चर्चा आहे. सांगलीच्या एक्झिट पोलमध्येही विशाल पाटील विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला. त्यामुळे संजयकाकांची धाकधूक वाढली आहे. सांगलीत बाजी कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
महाविकास आघाडीत सांगलीमुळे वादाची ठिणगी
महाविकास आघाडीतील जागावाटपामध्ये सांगलीची जागा ही सर्वाधिक वादाची ठरली. शिवसेना ठाकरे गटाने परस्पर या जागेवर चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केली आणि त्यानंतर जो वाद सुरू झाला तो शेवटपर्यंत मिटलाच नाही. काँग्रेसने यावर उघड उघड नाराजी दर्शवली, अगदी दिल्लीवाऱ्याही केल्या. पण शिवसेना ठाकरे गटाने शेवटपर्यंत ही जागा सोडली नाही. शेवटी विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला. तसंच विजयाचा विश्वासही व्यक्त केला.
विशाल पाटील यांना मिळाली मदत
काँग्रेसच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी विशाल पाटलांना मदत केली. खासकरून आमदार विश्वजीत कदम जरी महाविकास आघाडीच्या स्टेजवर दिसले तरी त्यांचा कल हा कुणाकडे होता हे उघड होतं. विश्वजीत कदमांची सर्व यंत्रणा ही विशाल पाटलांच्या मागे उभी राहिली आणि परिणामी विशाल पाटील यांचे पारडे जड झाले.
दुसरीकडे भाजपचे संजयकाका पाटलांना तिसऱ्यांना उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. सुरुवातीला संजयकाका सहज निवडून येतील अशी चर्चा असताना नंतर मात्र विशाल पाटलांनी त्यांच्यासमोर तगडं आव्हान निर्माण केल्याचं दिसून आलं.
विशाल पाटील जिंकणार असा अंदाज
सांगलीत महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील, महायुतीचे संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशी तिरंगी लढत होती. या तिरंगी लढतीत विशाल पाटील मारतील त्यामध्ये आता विशाल पाटील बाजी मारतील असा अंदाज १ जूनला जाहीर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये अंदाज व्यक्त झाला.
सांगली लोकसभेचा २०१९ चा निकाल काय होता?
संजयकाका पाटील – भाजप – ५,०८,९९५
विशाल पाटील – स्वाभिमानी – ३,४४६४३
गोपीचंद पडळकर – वंचित – ३,००,२३४
२०१९ चे विजयी उमेदवार-संजयकाका पाटील
भाजपाचे संजयकाका पाटील यांनी सांगलीची जागा जिंकली होती. आता विशाल पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. चंद्रहार पाटील हरतील असा अंदाज व्यक्त होतो आहे. विशाल पाटील यांची बंडखोरी संजयकाका पाटील यांच्या पथ्यावर पडते का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd