“भाजपाला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्या तर देशातील समविचारी पक्षांना एकत्र आणून आम्ही देशाला एक स्थिर सरकार देण्याचा नक्कीच प्रयत्न करू”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार म्हणाले, “यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकांपेक्षा कमी जागा मिळतील. महाराष्ट्रातील त्यांच्या जागा कमी होतील. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मिळून महाराष्ट्रात केवळ पाच जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी त्या जागा वाढणार आहेत.”
शरद पवार म्हणाले, “२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली होती. त्यामध्ये यंदा सुधारणा दिसेल. राजस्थान आणि गुजरातमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती, त्या दोन्ही राज्यात काँग्रेसला यंदा काही जागा मिळतील. हरियाणा, पंजाब आणि दिल्ली या तिन्ही राज्यातील काँग्रेसच्या स्थितीत तुम्हाला सुधारणा दिसेल. तर तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये भाजपाचा फारसा प्रभाव नाही, त्यमुळे त्यांना तिथे फारसा वाव नाही. परिणामी या राज्यांमध्ये त्यांना फार काही गवसणार नाही. ओडिसा राज्यात मागच्या वेळी भाजपा आणि मुख्यमंत्री तथा बिजू जनता दल (बिजद) या पक्षाचे प्रमुख नवीन पटनायक यांच्यात जवळीक होती. परंतु, यावेळी त्यांच्यात जवळीक नाही. त्याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिसामध्ये जाऊन नवीन पटनायक यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर हल्ला केला. त्यामुळे आता भाजपा आणि बिजदमध्ये कटूता आली आहे. परिणामी ओडिसा राज्यात भाजपाला मिळणारी मतं कमी झाली आहेत.”
शरद पवार म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये मागच्या वेळी भाजपाला १७ जागा मिळाल्या होत्या. यंदा त्या जागा ५० टक्क्यांनी कमी होतील, असं तिथल्या राजकीय जाणकारांचं आणि विश्लेषकांचे मत आहे. तिथे मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी भाजपाला जोरदार टक्कर दिली आहे. ही सगळी परिस्थिती पाहता भाजपा ४०० पार जाणं तर सोडा देशात सत्तास्थापनेसाठी लागणारं बहुमत तरी त्यांना मिळेल की नाही यात शंका आहे.” शरद पवार यांनी काही वेळापूर्वी पत्रकार प्रशांत कदम यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.
हे ही वाचा >> “लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे भाजपाबरोबर जातील”, प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यानंतर शरद पवार म्हणाले…
“…तर आम्ही देशाला स्थिर सरकार देऊ”
यावेळ शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला की भाजपाला बहुमतापेक्षा थोड्याफार जागा कमी पडल्या तर इंडिया आघाडी किंवा विरोधी बाकावर बसलेल्या पक्षांपैकी असे कोणते पक्ष आहेत जे एनडीएकडे जाणार नाहीत असं तुम्ही ठामपणे सांगू शकता? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “यावर ठामपणे काही सांगता येणार नाही. परंतु, समविचारी पक्षांना एकत्र ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.” भाजपाला बहुमत मिळालं नाही तर केंद्रात महाराष्ट्राप्रमाणे महाविकास आघाडीसारखा प्रयोग पाहायला मिळू शकतो का? असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले, “माझ्यासारखे काही लोक आहेत जे कशाचीही अपेक्षा न करता समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा करतील. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्यांना (एनडीए) बहुमतापेक्षा काही जागा कमी पडल्या तर आम्ही इतर सगळे (इंडिया आघाडी आणि इतर पक्ष) मिळून देशाला एक स्थिर सरकार देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. त्यासाठी एक किमान समान कार्यक्रम (कॉमन मिनिमम प्रोग्राम) तयार करू. संधी मिळाली तर त्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ.”
© IE Online Media Services (P) Ltd